पहिली जागतिक पिकलबॉल लीग चेन्नईत; माजी टेनिसपटू गौरव नाटेकर आणि अभिनेत्री समांथा प्रभू यांच्या उपस्थितीत घोषणा

टेनिस आणि टेबल टेनिस या खेळाचे मिश्रण असलेला पिकलबॉल या क्रीडा प्रकाराची पहिलीवहिली जागतिक स्पर्धा लवकरच खेळवण्यात येणार आहे.
पहिली जागतिक पिकलबॉल लीग चेन्नईत; माजी टेनिसपटू गौरव नाटेकर आणि अभिनेत्री समांथा प्रभू यांच्या उपस्थितीत घोषणा
@samantharuthprabhuoffl / Instagram
Published on

मुंबई : टेनिस आणि टेबल टेनिस या खेळाचे मिश्रण असलेला पिकलबॉल या क्रीडा प्रकाराची पहिलीवहिली जागतिक स्पर्धा लवकरच खेळवण्यात येणार आहे. चेन्नई येथे २४ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान जागतिक पिकलबॉल लीगचे आयोजन करण्यात येईल, याची घोषणा मंगळवारी मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान करण्यात आली.

माजी टेनिसपटू गौरव नाटेकर, अभिनेत्री समांथा प्रभू आणि अखिल भारतीय पिकलबॉल संघटनेचे अध्यक्ष अरविंद प्रभू यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी संमाथाने चेन्नई संघाचे मालकी हक्क स्वीकारल्याचीही घोषणा केली. नाटेकर यांच्या पुढाकाराने या लीगचे आयोजन करण्यात येणार असल्याने तेच पिकलबॉलच्या जागतिक लीगचे संस्थापक आहेत. सध्या या स्पर्धेत सहा संघ सहभागी होणार आहेत, असे समजते. मात्र संघांची नावे, त्यांचे मालक व स्पर्धेचे अधिकृत वेळापत्रक, तारखा याविषयी लवकरच घोषणा करण्यात येईल, असेही नाटेकर यांनी सांगितले.

“सध्या बरेचसे टेनिसपटू पिकलबॉल खेळताना दिसतात. या खेळात जास्त आर्थिक गुंतवणूक करावी लागत नाही. तसेच कोणत्याही वयोगटातील खेळाडू हा खेळ खेळू शकतो. विदेशांत हा खेळ खेळता जात असून भारतातही या खेळाचा अधिक प्रसार व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत,” असे नाटेकर म्हणाले. तसेच अभिनेत्री संमाथानेसुद्धा हा खेळ अन्य खेळाडूंना खेळताना पाहिले, तेव्हाच मी पिकलबॉलच्या प्रेमात पडले, असे सांगितले.

दरम्यान, १ सप्टेंबर रोजी पिकलबॉलची राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. १४ वर्षांखालील ते ६० वर्षांवरील विविध वयोगटांत ही स्पर्धा दहिसर येथे खेळवण्यात येईल.

पिकलबॉलविषयी

  • या खेळात टेनिससारखे काहीसे समान नियम आहेत.

  • सर्व्हिस करताना ११ गुणांचा, तर रॅली करताना १५ ते २१ गुणांचा सेट असतो.

  • आपल्या सर्व्हिसवरच येथे गुण मिळवता येतात. त्यामुळे सामना अधिक रंगतदार होतो.

  • या खेळात वापरण्यात येणारा बॉल हा प्लास्टिकचा असतो. त्यास २५ ते ४० छिद्रे असतात, तर रॅकेट ही टेबल टेनिसप्रमाणेच असते.

logo
marathi.freepressjournal.in