समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार? बहीण आणि वडिलांची होणार सीबीआय चौकशी

उद्या (30 मे) सकाळी 10 वाजेच्या सुमारास समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे आणि त्यांची बहीण दोघेही सीबीआयच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत
समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार? बहीण आणि वडिलांची होणार सीबीआय चौकशी
Published on

एनसीबी मुंबई झोनचे माजी डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या अडचणी काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीत. ते सीबीआय चौकशीच्या ससेमिऱ्यात अडकत चालल्याचे दिसून येत आहे. समीर वानखेडे यांच्याविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. सीबीआयकडून वानखेडे यांची बहीण आणि वडिलांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईच्या सीबीआय कार्यालयात ही चौकशी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. वानखेडे यांच्यानंतर सीबीआय आता त्यांच्या कुटुंबाचा जबाब नोंदवून घेणार आहे.

आर्यन खान कृझ ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख याला मुलगा आर्यन खानला सोडण्यासाठी खंडणी मागितल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी सीबीआयकडून वानखेडे आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने वानखेडे यांना 8 जून पर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं आहे. सीबीआयने वानखेडे यांची दोन दिवस कसून चौकशी केल्यानंतर आता त्यांच्या कुटुंबाची चौकशी करण्यात येणार आहे.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार उद्या (30 मे) सकाळी 10 वाजेच्या सुमारास समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे आणि त्यांची बहीण दोघेही सीबीआयच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. सीबीआयकडून याप्रकरणी त्यांची देखील चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे याप्रकरणी नेमकी कोणती नवीन माहिती समोर येते, हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

या प्रकरणी सीबीआय ऍक्शन मोडवर आली आहे. सीबीआयच्या एका पथकाने गुन्हा दाखल झाल्यानंतर थेट समीर वानखेडे यांच्या मुंबईतील घरावर छापा टाकाला होता. यात नेमकी सीबीआयला काय माहिती मिळाली याबाबत कळू शकलं नाही. मात्र, यावेळी वानखेडे यांच्याशी संबंधित आणखी काही ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती.

यावर बोलताना समीर वानखेडे यांनी आपण देशभक्त असल्याने आपल्याला त्याची शिक्षा भोगावी लागत असल्याचं कोर्टात सांगितलं होते. याबाबत त्यांनी दिल्ली हायकोर्टता धाव घेतली होती. दिल्ली हायकोर्टाने वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे काही काळ ते चौकशीपासून दूर होते.

दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायलयात दाद मागितली होती. यावेळी वानखेडे यांनी सीबीआयला चौकशीत सहकार्य करण्याचे आश्वासन देत अटकेपासून संरंक्षण मागितलं होतं. न्यायालयाकडून त्यांची मागणी मान्य करत अटक होण्यापासून संरक्षण दिलं होते. यानंतर सीबीआयने सलग दोन दिवस त्यांची चौकशी केली होती.

logo
marathi.freepressjournal.in