ज्या कुस्तीपटूंना राजकारण करायचे त्यांनी राजकारण करावे : संजय सिंह; ब्रिजभूषण यांच्या निकटवर्तीयाचे अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर वक्तव्य

तब्बल ११ महिन्यांनंतर झालेल्या भारतीय कुस्ती महासंघाच्या(WFI) अध्यक्षपदाची निवड पार पडली आहे. यात संजय सिंह यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.
ज्या कुस्तीपटूंना राजकारण करायचे त्यांनी राजकारण करावे : संजय सिंह; ब्रिजभूषण यांच्या निकटवर्तीयाचे अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर वक्तव्य
Published on

तब्बल ११ महिन्यांनंतर झालेल्या भारतीय कुस्ती महासंघाच्या(WFI) अध्यक्षपदाची निवड पार पडली आहे. यात संजय सिंह यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. संजय सिंह हे WFI चे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या जवळचे सहकारी आहेत. संजय सिंह यांनी निवड झाल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आता लवकरच कुस्तीचे राष्ट्रीय शिबीर आयोजित केले जातील. ज्या कुस्तीपटूंना राजकारण करायचे आहे त्यांनी ते करावे आणि ज्यांना कुस्ती खेळायची आहे त्यांनी कुस्ती खेळावी, असे त्यांनी म्हटले आहे.

संजय सिंह हे उत्तर प्रदेश कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष आहेत. त्यांनी भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या अनीता श्योरण यांचा पराभव केला आहे. ते ब्रिजभूषण शरण सिंह यांचे जवळचे मानले जातात. संजय सिंह हे WFI च्या मागच्या कार्यकारणीचा देखील हिस्सा होते. ते २०१९ पासून राष्ट्रीय महासंघाचे सचिव देखील होते.

भारताचे आघाडीचे कुस्तीपटू आणि ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक तसेच वर्ल्ड चॅम्पियनशिप पदक विजेती विनेश फोगाटसह अनेक कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. या कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर आंदोलन देखील छेडले होते. यावेळी कुस्तीपटूंकडून ब्रिजभूषण यांच्या परिवारातील कोणीही WFI च्या निवडणुकीत न उतरण्याची देखील मागणी केली होती.

ब्रिजभूषण यांनी व्यक्त केला होता विजयाचा विश्वास

कुस्तीपटूंनी केलेल्या मागणीनंतर ब्रिजभूषण यांच्या कुटुंबातून त्यांचा मुलगा प्रतीक किंवा जावई विशाल सिंह यापैकी कोणीही निवडणुकीत भाग घेतला नव्हता. ते म्हणाले होते की,आज ११ महिन्यानंतर महासंघाच्या निवडणुका होत आहेत. मला सांगितले गेल्याप्रमाणे माझ्या परिवारातील कोणीही या निवडणुकीत सहभागी झालेले नाही. संजय सिंह यांचा विजय निश्चित आहे. मी त्यांना लवकरात लवकर खेळासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा आग्रह करणार आहे.

दरम्यान, ब्रिजभूषण यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर त्यांना भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यावेळी त्यांना आपल्या परिवारातील कोणालाही निवडणुकीत न उतरवण्यास सांगितले होते. असे असले तरी निवडून आलेले संजय सिंह हे ब्रिजभूषण यांच्या मर्जीतले असल्याने पुन्हा वाद सुरु होण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in