

नवी दिल्ली: कारकीर्दीबद्दल होणाऱ्या चर्चेचा आणि टीकेचा सामना करायला शिकलो असलो तरी, भारतीय संघाच्या अव्वल फळीतील स्थानांसाठी असलेली तीव्र स्पर्धा आव्हानात्मक असू शकते, अशी प्रांजळ कबुली ३१ वर्षीय संजू सॅमसनने दिली आहे. तसेच, संघ निवडीच्या निर्णयांवर नाराजी व्यक्त करत बसण्यासाठी खेळाडूंकडे वेळ नसतो, असेही त्याने स्पष्ट केले.
अफगाणिस्तानविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात सॅमसनने २२ चेंडूंत ५७ धावांची धडाकेबाज खेळी करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. सामन्यानंतर तो म्हणाला, "बाहेरच्या टीकेचा निश्चितच परिणाम होतो. मी काही रोबोट किंवा मशीन नाही. सुरुवातीला वाईट वाटते, पण नंतर आपण स्वतःशी बोलून आपल्याला काय करायचे आहे, यावर लक्ष केंद्रित करावे लागते. जर मी त्या गोष्टींकडे लक्ष दिले असते, तर अशी फलंदाजी करू शकलो नसतो." १५ वर्षीय वैभवकडून मिळणाऱ्या स्पर्धेबद्दल सॅमसन म्हणाला की, "भारतीय संघ चालवणे सोपे नाही. जेव्हा १५ वर्षाचा मुलगा ७००-८०० धावा करतो, तेव्हा त्याला संधी द्यावीच
लागते. मी २-३ सामन्यांत कामगिरी करू शकलो नाही आणि तो चांगल्या फॉर्ममध्ये होता. कर्णधार आणि नेतृत्वाच्या दृष्टीने तो निर्णय अगदी योग्य होता. आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून मी स्वतः असे कठीण निर्णय घेतले आहेत, त्यामुळे मला या परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे." संघ व्यवस्थापनाकडून मिळणाऱ्या पाठिंब्यासह प्रशिक्षक गौतम गंभीरचे सॅमसनने आभार मानले. "आम्ही देशासाठी खेळतो, त्यामुळे सहकाऱ्यांबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे. मला संधी का मिळाली नाही किंवा दुसऱ्याला का दिली, असा विचार करून नकारात्मक मानसिकतेत राहन चालत नाही. केवळ आपल्या हातात काय आहे, यावरच लक्ष द्यावे लागते. यावेळी संघ व्यवस्थापनाने दिलेला पाठिंबा व कारभारातील स्पष्टता मोलाची ठरते," असे सॅमसनने सांगितले.
वरुण आशियाई स्पर्धेतून बाहेर
अनुभवी फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला पुन्हा दुखापतीने भेडसावले आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात झालेल्या स्नायूंच्या दुखापतीमुळे आता वरुण उर्वरित मालिकेसह आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेलाही मुकणार आहे. वरुणच्या जागी २२ वर्षीय लेगस्पिनर विपराज निगमचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे, जवळपास दोन महिन्यांनी वरुणने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. १९ सप्टेंबरपासून जपान येथे आशियाई स्पर्धेत टी-२० प्रकारात क्रिकेटचे सामने होतील. दुसरीकडे २७ सप्टेंबरपासून भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. कुलदीप यादवचा एकदिवसीय संघातील समावेश पक्का असल्याने त्याला आशियाई संघातदेखील स्थान लाभलेले नाही.