
भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका १-० अशी गमावली. न्यूझीलंडने पहिला सामना जिंकल्यानंतर दुसरा आणि तिसरा सामना हा पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे भारतीय संघाला विजयाची संधीच मिळाली नाही. परंतु, या दरम्यान एक मुद्दा सतत चर्चेत राहिला, तो म्हणजे भारतीय संघामध्ये संजू सॅमसनला (Sanju Samson) संधी न देणे. त्याऐवजी निवड करण्यात आलेल्या रिषभ पंतला साजेशी कामगिरी करता येत नसल्याने बीसीसीआयच्या निवडीवर चाहत्यांनी प्रश्नचिन्ह उभे केले. सोशल मीडियावर वी वॉन्ट संजू ट्रेंड होऊ लागल्यानंतर यावर जास्त चर्चा झाली.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत संजूला फक्त पहिल्या सामन्यात संधी देण्यात आली. त्यातही त्याने ३६ धावांची खेळी केली. मात्र, दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात त्याचा समावेश केला नाही. यावरून सोशल मीडियावर संघनिवडीबाबतीत कर्णधार शिखर धवन आणि बीसीसीआय निवड समितीला कारणीभूत धरण्यात आले. एका युझरने म्हंटले की, संजूला वारंवार दुर्लक्षित केले जात आहे. रिषभ पंतला जर संधी मिळू शकते, मग संजूला का नाही?