Ranji Trophy : सर्फराजच्या खेळीमुळे मुंबईला मोठी आघाडी; अखेरच्या दिवशी विजयाची संधी

मधल्या फळीतील दमदार फलंदाज सर्फराज खानच्या दमदार १५४ धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबईने रणजी करंडक एलिट गट ड सामन्यात हिमाचल प्रदेशविरुद्ध मोठी आघाडी घेतली आहे.
Ranji Trophy : सर्फराजच्या खेळीमुळे मुंबईला मोठी आघाडी; अखेरच्या दिवशी विजयाची संधी
Ranji Trophy : सर्फराजच्या खेळीमुळे मुंबईला मोठी आघाडी; अखेरच्या दिवशी विजयाची संधीX
Published on: 

बिलासपूर : मधल्या फळीतील दमदार फलंदाज सर्फराज खानच्या दमदार १५४ धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबईने रणजी करंडक एलिट गट ड सामन्यात हिमाचल प्रदेशविरुद्ध मोठी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा हिमाचल प्रदेशने दुसऱ्या डावात ३ बाद १४४ धावा केल्या होत्या. त्यांचा संघ अद्याप २४४ धावांनी पिछाडीवर असून अखेरच्या दिवशी मुंबईला विजयाची संधी आहे.

सर्फराजने २२८ चेंडूंत १९ चौकारांसह १५४ धावा केल्या. यष्टीरक्षक-फलंदाज आकाश आनंदने २३९ चेंडूंत १४ चौकारांसह ११७ धावांची खेळी केली. या दोघांच्या शतकांच्या जोरावर मुंबईने पहिला डाव ८ बाद ५२८ धावांवर घोषित केला.

सर्फराजने चौथ्या विकेटसाठी सिद्धेश लाडसोबत ६८ धावांची भागीदारी केली. लाडने ८७ धावा केल्या. त्यानंतर सर्फराजने आकाश आनंदसोबत पाचव्या विकेटसाठी २१० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा मुंबईची धावसंख्या ४ बाद ३९८ होती आणि सर्फराज १३९ धावांवर नाबाद होता. हिमाचल प्रदेशच्या दुसऱ्या डावात शम्स मुलानी, सिल्व्हेस्टर डिसोझा आणि मोहित अवस्थी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

दिवसअखेर हिमाचल प्रदेशकडून पुकराज मान ३८ धावांवर, तर वैभव कलिता २१ धावांवर खेळत होते.

तमिळनाडूचा डावाने विजय

चेन्नई येथे झालेल्या सामन्यात आर. साई किशोरच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर तमिळनाडूने उत्तराखंडचा एक डाव आणि ६६ धावांनी पराभव केला. तिसऱ्या दिवसातच तमिळनाडूने हा विजय मिळवला. तमिळनाडूने पहिल्या डावात ३१३ धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना उत्तराखंडचा पहिला डाव १३४ धावांत आटोपला. दुसऱ्या डावात उत्तराखंडने दिवसाची सुरुवात १ बाद ९ धावांवरून केली; मात्र त्यांचा संपूर्ण संघ ११३ धावांत गारद झाला. साई किशोरने ३४ धावांत सहा बळी घेतले. त्याने ४३व्या षटकातील अखेरच्या तीन चेंडूंवर लक्ष्य रायचंदानी (१९), सौरभ रावत (०) आणि आदित्य रावत (०) यांना बाद करत हॅट्ट्रिक नोंदवली. अजित रामने ३३ धावांत चार बळी घेत त्याला चांगली साथ दिली. उत्तराखंडकडून देगा निश्चलने ६१ चेंडूंत २५ धावा करत काहीसा प्रतिकार केला. या विजयामुळे तमिळनाडूला सात गुण मिळाले, तर उत्तराखंडला गुणांचे खाते उघडता आले नाही.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in