

जयपूर : सर्फराझ खान आणि दुखापती हे एक वेगळेच समीकरण बनले आहे. मुंबईचा स्टार फलंदाज सर्फराझ खान फॉर्मात असताना आता त्याला पुन्हा एकदा दुखापतीला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे विजय हजारे करंडक स्पर्धेतील उर्वरित सामन्यांना त्याला मुकावे लागणार आहे.
गेल्या १२ महिन्यांत सर्फराझला एकावर एक धक्के बसले आहेत. बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेदरम्यान त्याच्या बरगडीला दुखापत झाली, त्यामुळे त्याला भारतीय संघाबाहेर जावे लागले. त्यानंतर २०२४-२५च्या मोसमात त्याला रणजी करंडक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याला मुकावे लागले.
सर्फराझने त्यानंतर जोमाने मुसंडी मारत टी-२० क्रिकेटमध्ये शतक झळकावले आणि चेन्नई सुपर किंग्स संघात स्थान मिळवले. सध्या सुरू असलेल्या विजय हजारे करंडक स्पर्धेत उत्तराखंडविरुद्ध अर्धशतक केल्यानंतर त्याने गोव्याविरुद्ध आपली प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वोत्तम १५७ धावसंख्या उभारली. ३ जानेवारीला महाराष्ट्रविरुद्ध झालेल्या सामन्यात सर्फराझला दुखापतीमुळे खेळता आले नाही. आता त्याला विजय हजारे करंडक स्पर्धेतील उर्वरित सामन्यांना तसेच रणजी करंडक स्पर्धेलाही मुकावे लागणार आहे.