सर्फराझची झुंजार खेळी,पहिल्याच डावात ३७४ धावसंख्या

मध्य प्रदेश पहिल्या डावात अद्याप २५१ धावांनी पिछाडीवर आहे
सर्फराझची झुंजार खेळी,पहिल्याच डावात ३७४ धावसंख्या

सर्फराझ खानने (२४३ चेंडूंत १३४ धावा) साकारलेल्या आणखी एका झुंजार शतकाच्या बळावर मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पहिल्या डावात ३७४ अशी धावसंख्या उभारली. त्यानंतर मध्य प्रदेशनेसुद्धा १ बाद १२३ अशी मजल मारून मुंबईला चोख प्रत्युत्तर दिले.

बंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मध्य प्रदेशचे यश दुबे ४४ आणि शुभम शर्मा ४१ धावांवर खेळत होते. मध्य प्रदेश पहिल्या डावात अद्याप २५१ धावांनी पिछाडीवर आहे. तुषार देशपांडेने हिमांशू मंत्रीला ३१ धावांवर पायचीत पकडले. त्यानंतर यश आमि शुभम यांनी दुसेऱ्या गड्यासाठी आतापर्यंत ७६ धावांची भर घातली आहे.

तत्पूर्वी, बुधवारच्या ५ बाद २४८ धावांवरून पुढे खेळताना मुंबईने शम्स मुलानीला (१२) पहिल्याच षटकात गमावले. परंतु सर्फराझने तनुष कोटियनला (१५) साथीला घेत सर्वप्रथम अर्धशतक झळकावले. मग धवल कुलकर्णी, तुषार देशपांडे यांच्यासह त्याने आठव्या आणि नवव्या गड्यासाठी अनुक्रमे २६ आणि ३९ धावांची भर घातली. अर्धशतक झाल्यावर सर्फराझने आक्रमक रूप धारण करतानाच दोन षटकारही लगावले. त्याला स्टेडियममधील उपस्थित चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद लाभत होता.

कुमार कार्तिकेयच्या गोलंदाजीवर सरळ चौकार लगावून सर्फराझने दिमाखात शतकाची वेस ओलांडली. शतक झळकावल्यावर तो काहीसा भावूकही झाला. त्याने खास शैलीत केलेले सेलिब्रेशन समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय ठरत आहे. अखेर १३ चौकार आणि २ षटकारांसह १३४ धावा केल्यानंतर सर्फराझ बाद झाला आणि मुंबईचा पहिला डाव १२७.४ षटकांत ३७४ धावांवर आटोपला. मध्य प्रदेशसाठी गौरव यादवने चार, तर अनुभव अगरवालने तीन बळी मिळवले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in