सर्फराझला अखेर संधी! इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात समावेश, जडेजा- राहुल मुकणार

डावखुरा अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि अनुभवी फलंदाज के. एल. राहुल दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीला मुकणार आहेत.
सर्फराझला अखेर संधी! इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात समावेश, जडेजा- राहुल मुकणार

हैदराबाद : मुंबईचा प्रतिभावान २६ वर्षीय फलंदाज सर्फराझ खानला अखेर असंख्य वर्षांची मेहनत व प्रतीक्षेनंतर भारताच्या कसोटी संघात स्थान लाभले आहे. डावखुरा अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि अनुभवी फलंदाज के. एल. राहुल दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीला मुकणार आहेत. त्यामुळे सर्फराझसह ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदर आणि डावखुरा फिरकीपटू सौरभ कुमार यांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला पहिल्या कसोटीत २८ धावांनी पराभव पत्करावा लागला. उभय संघांतील पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरी कसोटी २ फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे खेळवण्यात येतील. जडेजाचे पहिल्या कसोटीदरम्यान स्नायू ताणले गेले, तर राहुलला उजव्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे ते तिसऱ्या कसोटीपर्यंत तरी संघात परततील का, याविषयी शंका आहे. राहुलला गतवर्षी आयपीएलमध्येसुद्धा याच दुखापतीमुळे काही काळ क्रिकेटपासून दूर रहावे लागले होते.

“जडेजा आणि राहुल दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीला मुकतील. ते दोघेही बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या निगराणीखाली असतील. त्यांच्या जागी सर्फराझ खान, वॉशिंग्टन सुंदर व सौरभ कुमार यांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे,” असे बीसीसीआयने ट्वीट केले.

सर्फराझ गेल्या २-३ वर्षांपासून रणजी स्पर्धेत सातत्याने छाप पाडत आहे. तसेच इंग्लंड-अ संघाविरुद्धच्या मालिकेत त्याने दोन शतके झळकावली. विराट कोहली दुसऱ्या कसोटीसाठीही अनुपलब्ध असल्याने सर्फराझला चौथ्या क्रमांकावर संधी मिळू शकते. २०१३पासून भारताने मायदेशात फक्त चौथी कसोटी गमावली आहे. त्यामुळे सर्फराझचा अंतिम ११ खेळाडूंतील समावेश फलदायी ठरेल का, हे पाहणे रंजक ठरेल.

दुसरीकडे सुंदर व उत्तर प्रदेशचा सौरभ या दोन्ही फिरकीपटूंपैकी एकालाच अंतिम ११मध्ये संधी मिळू शकते. त्यातच सुंदर हा फलंदाजीत सरस आहे. त्यामुळे कुलदीप यादव व सौरभच्या तुलनेत तोच अक्षर पटेल व रविचंद्रन अश्विनसह दुसऱ्या कसोटीत खेळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, सर्फराझ खान, श्रेयस अय्यर, के. एस. भरत, ध्रुव जुरेल, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमरा, मुकेश कुमार, आवेश खान, रजत पाटिदार, वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार.

भारताची पाचव्या स्थानी घसरण

इंग्लंडविरुद्धच्या पराभवामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) शर्यतीत भारताची पाचव्या स्थानी घसरण झाली आहे. आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका बरोबरीत सोडवल्यावर भारतीय संघ अग्रस्थानी होता. मात्र ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला नमवले व विंडीजविरुद्धची मालिका बरोबरीत राखली. त्यामुळे ऑस्ट्रेलिया ५५ टक्क्यांसह अग्रस्थानी आहे. त्यानंतर आफ्रिका, न्यूझीलंड, बांगलादेशचा प्रत्येकी ५० टक्क्यांसह क्रमांक लागतो. भारताच्या खात्यात ४३.३३ टक्के गुण जमा आहेत.

बुमराला ताकीद व डिमेरीट गुण

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला सामनाधिकाऱ्यांनी ताकीद दिली आहे. तसेच त्याला एक डिमेरीट गुण देण्यात आला आहे. पहिल्या कसोटीत ऑली पोप धावताना बुमरा जाणूनबूजून त्याच्या मार्गात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे दोन्ही खेळाडूंचा एकमेकांना धक्का लागला. आता पुढील २४ महिन्यांत बुमराला ३ डिमेरीट गुण देण्यात आले, तर त्याच्यावर एका कसोटी अथवा दोन एकदिवसीय सामन्यांची बंदी येऊ शकते. बुमराने त्याच्यावरील शिक्षा मान्य केली आहे.

सर्फराझच्या वडिलांकडून आभार

सर्फराझचे वडील नौशाद यांनी सर्फराझची दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात निवड होताच बीसीसीआयचे आभार मानले. त्याशिवाय मुंबई क्रिकेट असोसिएशन व निवड समितीलाही ते धन्यवाद म्हणाले. त्यांनी ट्विटरवर यासंबंधीची चित्रफीत पोस्ट केली. यादरम्यान ते काहीसे भावूक झालेलेही दिसले. काही वर्षांपूर्वी सर्फराझ मुंबई सोडून उत्तर प्रदेशला दाखल झाला होता. तेथून मग पुन्हा मुंबईकडे परतल्यावर त्याच्या कारकीर्दीने कलाटणी घेतली. गेल्या २-३ वर्षांत सर्फराझने रणजी स्पर्धेत सातत्याने शतके साकारून १००च्या सरासरीने धावा केल्या. मात्र त्याच्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत होते. आता सर्फराझला प्रथमच भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये वावरण्याची संधी मिळेल. यामुळे आपले एक स्वप्न पूर्ण झाले आहे. लवकरच सर्फराझ मैदानात उतरून आपले आणखी एक स्वप्न पूर्ण करेल, असेही नौशाद म्हणाले. सर्फराझचा भाऊ मुशीर सध्या युवा विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व करत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in