सात्त्विक-चिराग अंतिम फेरीत; मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा

सात्त्विक-चिराग अंतिम फेरीत; मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा

आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी जगज्जेत्या कोरियाच्या जोडीचा पराभव करत मलेशिया ओपन सुपर १००० स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

क्वालालंपूर : आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी जगज्जेत्या कोरियाच्या जोडीचा पराभव करत मलेशिया ओपन सुपर १००० स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी ही भारताची पहिली जोडी ठरली आहे.

जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सात्त्विक-चिराग जोडीने दमदार कमबॅक करत सहा गेमपॉइंट वाचवत ही लढत २१-१८, २२-२० अशी जिंकली. त्यांनी कोरियाच्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या कँग मिन ह्यूक आणि सेओ सेउंग जे या जोडीवर सरळ दोन गेममध्ये सरशी साधली. आपल्या कारकीर्दीतील दुसरे सुपर १००० जेतेपद जिंकण्यासाठी ते फक्त एक पाऊल दूर आहेत. याआधी त्यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये इंडोनेशिया ओपन सुपर १००० स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते.

कोरियाच्या याच जोडीने जून महिन्यात भारताच्या जोडीचा पराभव केला होता. मात्र सात्त्विक-चिराग जोडीने त्यांच्यावर आतापर्यंत ३-१ अशी सरशी साधली आहे. शॉर्ट रॅलीवर भर दिलेल्या या सामन्यात सात्त्विक-चिराग यांनी अचूक आणि रणनीतीनुसार खेळ करत प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. त्यांनी सुरुवातीलाच ९-५ अशी आघाडी घेतली होती. मात्र कोरियाच्या जोडीनेही त्यांना चोख प्रत्युत्तर देत सलग चार गुणांची कमाई केली. चिरागने परतीचे फटके अप्रतिमपणे परतवून लावत गुण मिळवले, तसेच भारतीय जोडीने नेटवरही चांगला खेळ करत ११-९ अशी आगेकूच केली. मात्र कोरियाच्या जोडीने ही पिछाडी १२-१३ अशी भरून काढली. त्यानंतर मात्र सात्त्विकने दमदार स्मॅशेस लगावत १७-१३ अशी आघाडी घेतली. चिरागनेही चांगला फटके लगावत गुण मिळवून दिले. कोरियाच्या जोडीने दोन फटके कोर्टबाहेर गेल्यामुळे भारतीय जोडीला २०-१६ अशी आघाडी घेता आली. मात्र भारतीय जोडीने दोन गुण गमावल्यानंतर सेओचा एक फटका नेटवर आदळला आणि सात्त्विक-चिराग यांना पहिला गेम जिंकता आला.

दुसऱ्या गेममध्ये सेओ आणि कँग हे आपल्या बचावात्मक खेळाबाबत अधिक सजग होते. त्यांनी शटलकॉकला योग्य जागी ढकलण्यावर लक्ष केंद्रित केले. अनेक वेळा त्यांनी या दोघांच्या मध्ये शटलकॉक टाकत गुण मिळवले आणि ९-४ अशी आगेकूच केली. सेओ पहिल्या गेममध्ये चांगली कामगिरी करत होता, तर दुसऱ्या गेममध्ये त्याला कँगचीही तितकीच दमदार साथ लाभली. त्यामुळेच कोरियाच्या जोडीला १७-११ अशी भक्कम आघाडी घेता आली.

चिरागने केलेल्या काही चुकांचा फटका म्हणून कोरियाच्या जोडीला सहा गेमपॉइंट मिळाले. हा गेम तिसऱ्या गेममध्ये जाणार असे वाटत असतानाच, दुसऱ्या गेमच्या अखेरीस कोर्टवर नाट्यमय घडामोडी घडल्या. १४-२० अशा पिछाडीवरून सात्त्विक-चिराग यांनी चौथा गिअर टाकत सलग आठ गुण मिळवले आणि कोरियाच्या जोडीकडून दुसरा गेम जिंकून घेत अंतिम फेरीत कूच केली. सात्त्विक-चिराग हे गेल्या वर्षी सर्वात यशस्वी भारतीय बॅडमिंटनपटू ठरले. त्यांनी आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याबरोबरच इंडोनेशिया सुपर १०००, आशियाई चॅम्पियनशिप, कोरिया सुपर ५०० आणि स्विस ओपन सुपर ३०० स्पर्धा जिंकली होती. तसेच त्यांनी नोव्हेंबर महिन्यात चीन मास्टर्स सुपर ७५० स्पर्धेच्या अंतिम फेरीतही धडक मारली होती.

logo
marathi.freepressjournal.in