विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचे सात्विक-चिरागचे लक्ष्य; जपान ओपनला आजपासून सुरुवात

मंगळवारपासून सुरू होणाऱ्या जपान ओपन सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी हे आपला विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी मैदानात उतरतील.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

टोकीयो : मंगळवारपासून सुरू होणाऱ्या जपान ओपन सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी हे आपला विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी मैदानात उतरतील.

जागतिक क्रमवारीत १५ व्या स्थानी असलेली सात्विक आणि चिराग ही जोडी यंदाच्या हंगामात तीन वेळा उपांत्य फेरीपर्यंत पोहचली आहे. तसेच गेल्या महिन्यात इंडोनेशिया ओपनमध्ये या जोडीने उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. जानेवारी महिन्यात इंडिया ओपन आणि मलेशिया ओपनमध्ये उपांत्य फेरीत त्यांचे आव्हान संपुष्टात आले होते. यंदाच्या हंगामात या जोडीला एकही विजेतेपद पटकवता आलेले नाही. त्यामुळे विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचे लक्ष्य या जोडीचे असेल.

एकेरीत लक्ष्य सेन आणि पी. व्ही. सिंधू हे दोन खेळाडू विजयी लय शोधण्याच्या प्रयत्नात असतील. यंदाच्या हंगामात लक्ष्य सेन विजयासाठी धडपडताना दिसत आहे. गेल्या काही सामन्यांत त्याला पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला आहे. ऑल इंग्लंडमध्ये त्याने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. अन्य स्पर्धांमध्ये त्याची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. जागतिक क्रमवारीत १६ व्या स्थानी असलेल्या पी. व्ही. सिंधूने जानेवारीमध्ये इंडिया ओपनमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. २०२५ मधली ही तिची सर्वात चांगली कामगिरी होती. ३० वर्षीय भारतीय खेळाडूला चालू वर्षात चार वेळा पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागला आहे, तर तीन वेळा दुसऱ्या फेरीत गाशा गुंडाळावा लागला आहे. तिच्याकडून या स्पर्धेत चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

logo
marathi.freepressjournal.in