शेंझेन (चीन) : भारताची तारांकित जोडी सात्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी माजी जागतिक विजेत्या मलेशियाच्या आरोन चिआ आणि सोह वुई यिक या जोडीला शनिवारी पराभूत करत चीन मास्टर्स सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत अंतिम फेरीत प्रवेश केला.
जागतिक स्पर्धेत कांस्य, गेल्या आठवड्यात झालेल्या हाँगकाँग ओपनमध्ये रौप्य आणि आशिया गेम्समध्ये विजेतेपद पटकावलेल्या भारताच्या सात्विक-चिराग जोडीने त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी आरोन आणि सोह यांना २१-१७, २१-१४ असे सरळ सेटमध्ये पराभूत करत आगेकूच केली.
शनिवारी झालेल्या या उपांत्य फेरीच्या लढतीत भारतीय जोडीने आक्रमक पवित्रा स्वीकारला. बचावही चांगला केला. ४१ मिनिटे चालेल्या या लढतीत भारतीय जोडीने मलेशियन जोडीला पराभूत केले. पहिला गेम हा अटीतटीचा झाला. आरोन आणि सोह यांनी सलग ४ गुण मिळवत १०-७ अशी आघाडी घेतली होती. परंतु आरोनने ३ चुका केल्या. त्यामुळे भारतीय जोडीने सामन्यात पुनरागमन केले.
१४-१३ असे गुणफलक असताना आरोनने पुन्हा चूक केली. सात्विकचे फटके आणि प्रतिस्पर्धी जोडीच्या चुका यामुळे भारतीय संघाने १८-१४ अशी आघाडी घेतली. त्यानंतर सामनाही खिशात घातला. दुसऱ्या सेटमध्ये सात्विक-चिराग जोडीने सुरुवातीलाच ५-२ अशी आघाडी घेतली. मध्यांतराला ही आघाडी ११-६ अशी नेली. आरोन-सोह यांनी गुणांचे अंतर ९-११ असे कमी केले. पण भारतीय जोडीने पुन्हा खेळ उंचावत सेटसह विजयावर शिक्कामोर्तब केले.
या विजयासह भारतीय जोडीने स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे या जोडीकडून अंतिम विजेतेपद पटकावण्याची आशा भारतीय चाहत्यांना आहे. शुक्रवारी झालेल्या लढतीत भारतीय जोडीने उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. पुरुष दुहेरीत जागतिक कांस्यपदक विजेत्या सात्विक-चिराग यांनी गुरुवारी सियांग चेऊ आणि वँग ची लिन या चायनीज तैपईच्या जोडीला २१-१३, २१-१२ असे नेस्तनाबूत केले होते. त्यानंतर शुक्रवारी त्यांनी उपांत्यपूर्व लढतीत या आठव्या मानांकित भारतीय जोडीने रेन झियांगू व झेन पेंग या चीनच्या जोडीवर २१-१४, २१-१४ असे वर्चस्व गाजवले.
महिला एकेरीत पी. व्ही. सिंधूची वाटचाल उपांत्यपूर्व फेरीत थांबली होती.
स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या पी. व्ही. सिंधूने पहिल्या फेरीत डेन्मार्कच्या जुली जोकोसेनला २१-४, २१-१० असे पराभूत केले. त्यानंतर गुरुवारी झालेल्या लढतीत सिंधूने थायलंडच्या सहाव्या मानांकित चोचूवाँगला २१-१५, २१-१५ असे नमवले. मात्र शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीत सिंधूला गाशा गुंडाळावा लागला. अग्रमानांकित अॅन से यंगकडून पराभव पत्करावा लागला.
स्पर्धेत मिश्र दुहेरीत रोहन कपूर व ऋत्विका घाडे यांचा पराभव झाला. ध्रुव कपिला व तनिषा क्रैस्टो यांचेही आव्हान संपुष्टात आले. पुरुष एकेरीत लक्ष्य सेन सलामीलाच गारद झाला. तर एच. एस. प्रणॉय या स्पर्धेत सहभागी झालेला नाही.
दरम्यान भारतीय जोडीकडून आता सुवर्ण पदक जिंकण्याची चाहत्यांना आशा आहे.
बीजिंगः अबु हुबैदा आणि प्रेम कुमार आले या भारतीय पुरुष पॅरा बैडमिंटन जोडीने चीन पॅरा बॅडमिंटन स्पर्धेच्या डब्ल्यूएच१-डब्ल्यूएचर या प्रकारात शनिवारी कांस्य कमाई केली. उपांत्य फेरीच्या लढतीत चीनच्या माई जिआनपेंग आणि क्यू झिमो या जोडीने भारतीय जोडीला ला ४-२१, १०-२१ असे पराभूत केले. अबु हुबैदा आणि आणि प्रेम कुमार या जोडीने २ विजय आणि एका पराभवासह 'अ' गटातून दुसरे स्थान मिळवले होते. त्यांनी ऑस्ट्रेलिच्या नँग एनगुएन आणि चीन तैपईच्या यू यू आँग यांना २१-६, २१-१० असे पराभूत केले. अन्य लढतीत हॅरीस मैथीली श्रीकुमार आणि झेडबायनेक सायकोरा या जोडीला २१-१०, २१-१२ अशी धूळ चारली.