
नवी दिल्ली : सात्विक साइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीला शनिवारी इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारताचेही स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
नवी दिल्ली येथील खाशाबा जाधव क्रीडा संकुलात सुरू असलेल्या तसेच ७५० सुपर गुणांचा दर्जा असलेल्या या स्पर्धेत सात्विक-चिरागच्या रूपात एकमेव भारतीय जोडी शिल्लक होती. मात्र पुरुष दुहेरीच्या उपांत्य सामन्यात जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या मलेशियाच्या गोह फेई आणि नूर इझुद्दीन यांनी सात्विक-चिरागला २१-१८, २१-१४ अशी सहज धूळ चारली. सात्विक-चिरागने ३७ मिनिटांतच ही लढत गमावली. गतवर्षीसुद्धा सात्विक-चिरागला उपांत्य फेरीतच पराभव पत्करावा लागला होता.
दरम्यान, शुक्रवारी महिला एकेरीत इंडोनेशियाच्या जॉर्जिया मारिस्काने सिंधूला २१-९, १९-२१, २१-१७ असे पराभूत केले. तसेच पुरुष एकेरीत चीनच्या हाँग वेंगने किरणला २१-१३, २१-१९ असे नेस्तनाबूत केले. त्यामुळे भारताचे एकेरीतील अभियान संपुष्टात आले होते. आता पुढील आठवड्यात जकार्ता येथे इंडोनेशिया ओपन स्पर्धा सुरू होईल. तेथे भारतीय खेळाडूंकडून चमकदार कामगिरी अपेक्षित आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी निराशा केली होती.