Paris 2024 Olympics: सात्विक-चिरागची अग्रस्थानासह कूच; अश्विनी-तनिषाचे आव्हान संपुष्टात!

बॅडमिंटनमध्ये पुरुष दुहेरीतील भारताची आघाडीची जोडी सात्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी अग्रस्थानासह उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. मात्र महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रॅस्टो यांचे आव्हान संपुष्टात आले
Paris 2024 Olympics: सात्विक-चिरागची अग्रस्थानासह कूच; अश्विनी-तनिषाचे आव्हान संपुष्टात!
Narendra Modi Twitter
Published on

पॅरिस : बॅडमिंटनमध्ये पुरुष दुहेरीतील भारताची आघाडीची जोडी सात्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी अग्रस्थानासह उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. मात्र महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रॅस्टो यांचे आव्हान संपुष्टात आले.

जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या सात्विक-चिराग यांनी क-गटातील अखेरच्या साखळी सामन्यात फझर अल्फियान आणि मोहम्मद रियान या इंडोनेशियाच्या जोडीला २१-१३, २१-१३ असे सरळ दोन गेममध्ये नामोहरम केले. त्यामुळे त्यांनी गटात २ विजयांसह अग्रस्थान काबिज केले. जर्मनीच्या मार्क-मार्व्हिन जोडीने दुखापतीमुळे माघार घेतली. त्यामुळे सात्विक-चिरागचा एक सामना रद्द झाला. बुधवारी उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.

दरम्यान, महिला दुहेरीत अश्विनी-तनिषा जोडीला क-गटात सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. सेतना मापसा आणि अँजेला यू या ऑस्ट्रेलियन जोडीने भारतीय जोडीला २१-१५, २१-१० अशी धूळ चारली. या पराभवानंतर ३४ वर्षीय अश्विनीने ही कारकीर्दीतील अखेरची ऑलिम्पिक स्पर्धा असल्याचे जाहीर केले. २०१२ व २०१६च्या ऑलिम्पिकमध्ये अश्विनी ज्वाला गुट्टाच्या साथीने खेळली होती. मात्र तिला पदक जिंकता आले नाही.

logo
marathi.freepressjournal.in