

शेन्झेन : भारताची स्टार पुरुष दुहेरी जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी रणनीतीपूर्ण खेळाचे प्रदर्शन करत 'चायना मास्टर्स' बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीत चौथ्या मानांकित भारतीय जोडीने मलेशियाच्या नूर मोहम्मद अझिन अय्युब आणि टॅन वी किओंग या जोडीचा ३ सेट्सच्या संघर्षात पराभव केला. या विजयासह सात्विक आणि चिराग मोसमातील दुसऱ्या विजेतेपदापासून अवघे एक पाऊल दूर आहेत.
जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील विजेत्या सात्विक आणि चिरागने दुसऱ्या गेममधील पिछाडीवरून सावरत जागतिक क्रमवारीतील २९ व्या क्रमांकाच्या मलेशियन जोडीवर २१-१५, १८-२१, २१-११ असा ६५ मिनिटांत विजय मिळवला. २०२३ आणि २०२५ च्या आवृत्तीत उपविजेते ठरलेल्या भारतीय जोडीची ही या स्पर्धेतील तिसरी अंतिम फेरी आहे. आता सुवर्णपदकाच्या लढतीत त्यांची गाठ मलेशियाचे टी काई वुन आणि याप रॉय किंग तसेच चीनचे हे जी टिंग आणि रेन शियांग यु यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्याशी पडेल.
सामन्याच्या सुरुवातीला ०-५ अशी पिछाडी पडल्यानंतर सात्विक चिरागने सलग सात गुण घेत ७-५ अशी आघाडी घेतली.
या दरम्यान ३४ शॉट्सची प्रदीर्घ रॅली पाहायला मिळाली. १८-१५ अशी स्थिती असताना दोन्ही जोड्यांमध्ये ५४ शॉट्सची थरारक रॅली झाली. अखेर मलेशियाचा शॉट कोर्टबाहेर गेल्याने भारताला गुण मिळाला आणि पहिला गेम सात्विक-चिरागने २१-१५ असा जिंकला.
दुसऱ्या गेममध्ये सात्विकच्या काही चुकांमुळे मलेशियाने मध्यंतराला ११-१० अशी आघाडी घेतली आणि अखेर १८-२१ असा गेम जिंकून सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली.
सात्त्विकचे दमदार स्मॅशेस
निर्णायक तिसऱ्या गेममध्ये सात्विक आणि चिरागने सुरुवातीपासूनच ५-२ अशी भक्कम आघाडी घेतली. चिरागने जाळ्यात मोकळी जागा शोधून मलेशियन खेळाडूंवर दबाव आणला. सात्विकच्या जोरदार स्मॅशमुळे धावसंख्या १३-६ झाली. चिरागच्या बैंकलाईनवरील शॉटमुळे भारताला ११ मॅच पॉईंटस मिळाले. प्रतिस्पध्र्थ्यांनी दोन मॅच पॉईंट्स वाचवले, मात्र तिसऱ्या संधीवर चिरागने सुरेख फ्लिक सर्व्हवर गुण मिळवत २१-११ अशा फरकाने विजय मिळवला.