

हांगझो : सात्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या तारांकित भारतीय जोडीने गुरुवारी बॅडमिंटन वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला. याबरोबरच त्यांनी ब-गटात अग्रस्थान मिळवताना उपांत्य फेरीच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे.
हंगामातील अखेरची स्पर्धा म्हणून दरवर्षी डिसेंबरमध्ये वर्ल्ड टूर फायनल्स रंगते. यामध्ये जागतिक क्रमवारीत पहिल्या आठ स्थानी असलेल्या खेळाडूंचा समावेश करण्यात येतो. तसेच वर्षभरातील कामगिरीचाही आढावा घेतला जातो. पुरुष दुहेरीत आठ जोड्यांची दोन गटांत विभागणी करण्यात आली असून दोन्ही गटांतील आघाडीच्या दोन जोड्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. सात्विक-चिराग जोडी सध्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असल्याने त्यांना या स्पर्धेसाठी तिसरे मानांकन देखील लाभले आहे. त्यांच्या रुपात भारताची एकमेव जोडी या स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. पुरुष अथवा महिला एकेरीत, महिला दुहेरी व मिश्र दुहेरीत भारताचा कोणताही स्पर्धक नाही.
सात्विक-चिरागचा या स्पर्धेसाठी ब-गटात समावेश आहे. त्यांनी बुधवारी पहिल्या लढतीत लियांग वेई व वँग चँग या चीनच्या ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या जोडीला १२-२१, २२-२०, २१-१४ असे तीन गेममध्ये पिछाडीवरून नमवले. मग गुरुवारी दुसऱ्या साखळी सामन्यात सात्विक-चिराग यांनी फजर अल्फियान व मोहम्मद फिकरी या इंडोनेशियाच्या आठव्या मानांकित जोडीवर २१-११, १६-२१, २१-११ अशी मात केली. आता शुक्रवारी रंगणाऱ्या अखेरच्या साखळी सामन्यात सात्विक-चिरागसमोर आरोन चिया व सोह वू यिक या मलेशियाच्या दुसऱ्या मानांकित जोडीचे आव्हान असेल.
दरम्यान, २५ वर्षीय सात्विक व २८ वर्षीय चिराग यांनी २०२५ या वर्षात एकही स्पर्धा जिंकलेली नाही. मात्र जागतिक स्पर्धेत त्यांनी कांस्यपदक मिळवले होते. सात्विकच्या दुखापतीमुळे अनेक स्पर्धांमधून या जोडीला माघारसुद्धा घ्यावी लागली. हाँगकाँग व चीन मास्टर्स या स्पर्धेत सात्विक-चिरागने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. मात्र दोन्ही वेळेस त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्याशिवाय मलेशिया ओपन, चीन ओपन, सिंगापूर ओपन येथे त्यांनी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.