जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : सात्विक-चिरागचे पदक निश्चित; मलेशियाच्या जोडीवर सरशी

भारताचे स्टार बॅडमिंटनपटू सात्विकसाईसाज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत पदक निश्चित केले. शुक्रवारी रात्री उशीरा झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय जोडीने मलेशियाची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती जोडी आरोन चिआ आणि सोह वुई यिक यांना पराभूत करण्याची कामगिरी केली.
जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : सात्विक-चिरागचे पदक निश्चित; मलेशियाच्या जोडीवर सरशी
Published on

पॅरिस : भारताचे स्टार बॅडमिंटनपटू सात्विकसाईसाज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत पदक निश्चित केले. शुक्रवारी रात्री उशीरा झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय जोडीने मलेशियाची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती जोडी आरोन चिआ आणि सोह वुई यिक यांना पराभूत करण्याची कामगिरी केली.

वर्षभरापूर्वी मलेशियाच्या याच जोडीने सात्विकसाईसाज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीला पराभूत करत पदक जिंकण्यापासून दूर ठेवले होते. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या भारतीय जोडीने ४३ मिनिटे खेळल्या गेलेल्या सामन्यात २१-१२, २१-१९ अशी बाजी मारत आगेकूच केली.

भारतीय जोडी उपांत्य फेरीच्या सामन्यात जागतिक क्रमवारीत ११व्या मानांकित चीनच्या चेन बो यँग आणि लिऊ यी यांच्याशी भिडेल.

दुसऱ्या गेममध्ये आम्ही आघाडीवर होतो. मात्र तरीही मला माहीत होते की, विजय मिळविणे सोपे नाही. यापूर्वी आम्ही अनेकदा आमनेसामने आलो आहोत. प्रत्येक वेळी सामना अटीतटीचा झाला असल्याचे सात्विक म्हणाला.

पहिल्या गेममध्ये सात्विकच्या अप्रतिम खेळाने भारताने ११-५ अशी आघाडी घेतली. चिआ-सोह जोडीने खेळ उंचावत सामन्यात पुनरागमन केले. पण भारताने पुन्हा पकड घेतली. १५-८ नंतर भारतीय जोडीने खेळावर पूर्ण नियंत्रण मिळवले. चिरागची कोर्टवरील चपळता आणि सात्विकच्या सर्व्हिसने सामन्यावर वर्चस्व मिळवले.

दुसऱ्या गेममध्येही भारताची आक्रमक खेळी कायम होती. सात्विकच्या शानदार सर्व्हिस आणि चिरागच्या स्मॅशने भारताला १०-५ अशी आघाडी मिळवून दिली. परंतु मलेशियाच्या जोडीने खेळ उंचावत सामन्यात पुनरागमन केले. सात्विकच्या चुकलेल्या शॉटमुळे मलेशियाने १८-१९ अशी पिछाडी कमी केली. पुढे सात्विकच्या चुकीमुळे स्कोअर १९-१९ झाला. मलेशियन जोडीने मागील १० पैकी ८ गुण जिंकून जोरदार पुनरागमन केले. परंतु भारताने शानदार खेळ करत गेम जिंकत सामनाही खिशात घातला.

स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या लढतीत भारताच्या पी. व्ही. सिंधू, ध्रुव-तनिश यांना उपांत्यपूर्व फेरीत गाशा गुंडाळावा लागला. पराभवामुळे पी. व्ही. सिंधूचे महिला एकेरीत पदक जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. शुक्रवारी रात्री झालेल्या सामन्यात सात्विक आणि चिराग जोडीकडून भारताला पदकांची अपेक्षा होती. मलेशियाच्या जोडीला पराभूत करून भारतीय जोडीने स्पर्धेतील आपले पदक निश्चित केले आहे.

मलेशियाच्या जोडीला पराभूत केल्यानंतर खूप छान वाटत आहे. ऑलिम्पिकचा सामना पुन्हा खेळल्यासारखे वाटते. एक वर्षानंतर आम्ही हिसाब चुकता केला. त्यावेळी ऑलिम्पिक, पण आता जागतिक बॅडमिंटन स्पर्धा आहे. - चिराग शेट्टी

उपांत्य फेरीत प्रवेश केला असल्याने प्रतिस्पर्धी असलेल्या चीन जोडीला कमी समजण्याचा प्रश्नच येत नाही. स्पर्धेतील अन्य सामन्यांप्रमाणे हा सामना असेल. चीनची जोडीही चांगली खेळत आहे. या जोडीबरोबर पुन्हा सामना होत आहे. आमचे लक्ष्य उपांत्य फेरीच्या सामन्यावर आहे. - सात्विकसाईसाज रंकीरेड्डी

logo
marathi.freepressjournal.in