सात्विक-चिरागचा विजयारंभ; वर्ल्ड टूर फायनल्सच्या उत्कंठावर्धक पहिल्या सामन्यात पिछाडीवरून सरशी

सात्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या तारांकित भारतीय जोडीने बुधवारी बॅडमिंटन वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेत विजयी सलामी नोंदवली.
सात्विक-चिरागचा विजयारंभ
सात्विक-चिरागचा विजयारंभPhoto : X (airnewsalerts)
Published on

हांगझो : सात्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या तारांकित भारतीय जोडीने बुधवारी बॅडमिंटन वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेत विजयी सलामी नोंदवली.

हंगामातील अखेरची स्पर्धा म्हणून दरवर्षी डिसेंबरमध्ये वर्ल्ड टूर फायनल्स रंगते. यामध्ये जागतिक क्रमवारीत पहिल्या आठ स्थानी असलेल्या खेळाडूंचा समावेश करण्यात येतो. तसेच वर्षभरातील कामगिरीचाही आढावा घेतला जातो. पुरुष दुहेरीत आठ जोड्यांची दोन गटांत विभागणी करण्यात आली असून दोन्ही गटांतील आघाडीच्या दोन जोड्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. सात्विक-चिराग जोडी सध्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असल्याने त्यांना या स्पर्धेसाठी तिसरे मानांकन देखील लाभले आहे. त्यांच्या रुपात भारताची एकमेव जोडी या स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. पुरुष अथवा महिला एकेरीत, महिला दुहेरी व मिश्र दुहेरीत भारताचा कोणताही स्पर्धक नाही.

सात्विक-चिरागचा या स्पर्धेसाठी ब-गटात समावेश आहे. त्यांनी बुधवारी पहिल्या लढतीत लियांग वेई व वँग चँग या चीनच्या ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या जोडीला १२-२१, २२-२०, २१-१४ असे तीन गेममध्ये पिछाडीवरून नमवले. २५ वर्षीय सात्विक व २८ वर्षीय चिराग यांनी १ तास १५ मिनिटांच्या संघर्षानंतर चीनच्या पाचव्या मानांकित जोडीला नमवले. आता गुरुवारी सात्विक-चिरागसमोर फजर अल्फियान व मोहम्मद फिकरी या इंडोनेशियाच्या जोडीचे आव्हान असेल. मग १९ तारखेला त्यांची अखेरच्या साखळी लढतीत आरोन चिया व सोह वू यिक या मलेशियाच्या दुसऱ्या मानांकित जोडीशी गाठ पडेल.

दरम्यान, सात्विक-चिराग यांनी २०२५ या वर्षात एकही स्पर्धा जिंकलेली नाही. मात्र जागतिक स्पर्धेत त्यांनी कांस्यपदक मिळवले होते. सात्विकच्या दुखापतीमुळे अनेक स्पर्धांमधून या जोडीला माघारसुद्धा घ्यावी लागली. हाँगकाँग व चीन मास्टर्स या स्पर्धेत सात्विक-चिरागने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. मात्र दोन्ही वेळेस त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्याशिवाय मलेशिया ओपन, चीन ओपन, सिंगापूर ओपन येथे त्यांनी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.

सात्विक-चिराग यांना वर्षभरात एकही स्पर्धा जिंकता आलेली नाही. मात्र त्यांनी हाँगकाँग व चीन मास्टर्स या दोन स्पर्धांची अंतिम फेरी गाठली होती.

आशियाई स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर

चीन येथे ३ ते ८ फेब्रुवारी २०२६ या काळात रंगणाऱ्या आशियाई सांघिक बॅडमिंटन स्पर्धेसाठी बुधवारी भारताचा संघ जाहीर करण्यात आला. या संघात पी. व्ही. सिंधू, लक्ष्य सेनपासून दुहेरीत सात्विक-चिराग यांसारख्या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. याच स्पर्धेत २०२४मध्ये भारतीय महिलांनी सांघिक विभागात विजेतेपद पटकावले होते. पुरुषांना त्यावेळी यश लाभले नाही. मात्र २०१६ व २०२०मध्ये पुरुषांनी कांस्यपदक जिंकले होते. आता २०२६मध्ये दोन्ही संघांच्या कामगिरीकडे चाहत्यांचे पुन्हा एकदा लक्ष असणार आहे.

भारतीय संघ

  • पुरुष : लक्ष्य सेन, आयुष शेट्टी, किदाम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय, तरुण मनेपल्ली, सात्विक-चिराग, पृथ्वी रॉय, साई प्रतीक, हरिहरन.

  • महिला : पी. व्ही. सिंधू, उन्नती हूडा, तन्वी शर्मा, रक्षिता रामराज, मालविका बनसोड, ट्रीसा जॉली, गायत्री गोपिचंद, प्रिया कोंजेबम, श्रुती मिश्रा, तनिषा क्रॅस्टो.

logo
marathi.freepressjournal.in