सात्विक-चिरागला कांस्यपदक; पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत पराभूत; जागतिक स्पर्धेत दुसऱ्यांदा कांस्य

भारताची पुरुष दुहेरीतील आघाडीची जोडी सात्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले. सात्विक-चिरागला शनिवारी मध्यरात्री झालेल्या उपांत्य लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले.
सात्विक-चिरागला कांस्यपदक; पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत पराभूत; जागतिक स्पर्धेत दुसऱ्यांदा कांस्य
Photo : X (@TheKhelIndia)
Published on

पॅरिस : भारताची पुरुष दुहेरीतील आघाडीची जोडी सात्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले. सात्विक-चिरागला शनिवारी मध्यरात्री झालेल्या उपांत्य लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले.

पॅरिस येथे जागतिक बॅडमिंटन स्पर्धा सुरू असून या स्पर्धेतून आतापर्यंत लक्ष्य सेन, एच. एस. प्रणॉय यांचे आव्हान आधीच संपुष्टात आले होते. मग शुक्रवारी पी. व्ही. सिंधू, ध्रुव-तनिषा यांनी अनुक्रमे महिला एकेरी व मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागल्याने त्यांचे पदक हुकले. त्यामुळे फक्त सात्विक-चिरागवरच भारताच्या आशा टिकून होत्या. जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या सात्विक-चिरागने उपउपांत्यपूर्व लढतीत वँग चेंग व लियाँग विकेंग या चीनच्या सहाव्या मानांकित जोडीवर १९-२१, २१-१५, २१-१७ अशी तीन गेममध्ये मात केली.

मग शुक्रवारी रात्री त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत आरोन चिया व सोह यिक या मलेशियाच्या दुसऱ्या मानांकित जोडीचा २१-१२, २१-१९ असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. जागतिक स्पर्धेत उपांत्य फेरी गाठल्यावर पदक निश्चित होते. कांस्यपदकासाठी वेगळी लढत खेळवण्यात येत नाही. त्यामुळे सात्विक-चिरागने २०२२नंतर पुन्हा एकदा जागतिक पदक जिंकले. त्यावेळी त्यांनी कांस्यपदक मिळवले होते. परंतु त्यांच्याकडून यावेळी सुवर्णपदकाची अपेक्षा होती.

मात्र शनिवारी रात्री झालेल्या पुरुष दुहेरीच्या उपांत्य सामन्यात चेन बो यँग व ल्यू यी या चीनच्या ११व्या मानांकित जोडीने सात्विक-चिरागवर २१-१९, १८-२१, २१-१२ अशी तीन गेममध्ये मात केली. तब्बल १ तास आणि ७ मिनिटांच्या संघर्षानंतर सात्विक-चिरागला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. याबरोबरच भारताचेही स्पर्धेतील आव्हान समाप्त झाले. मात्र भारताची जागतिक स्पर्धेत किमान एक पदक जिंकण्याची २०११पासूनची मालिका कायम राहिली. भारताने गेल्या १४ वर्षांत प्रत्येक जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत किमान एक पदक जिंकलेले आहे.

आशियाई पदक विजेत्या सात्विक-चिराग यांना २०२० व २०२४च्या ऑलिम्पिकमध्ये पदकाने हुलकावणी दिली. मात्र जागतिक स्पर्धेत त्यांनी चांगली कामगिरी केली होती. एकेरीत भारतीय खेळाडू निराशा करत असताना दुहेरीत सात्विक-चिरागच भारताचे आशा स्थान होते. उपांत्य फेरीत पहिला गेम गमावल्यावर दुसऱ्या गेममध्ये त्यांनी झोकात पुनरागमन केले. मात्र निर्णायक तिसऱ्या गेममध्ये त्यांच्याकडून क्षुल्लक चुका झाल्या. याचा लाभ चीनच्या जोडीने उचलला. एकवेळ चीनची जोडी ९-० असे आघाडीवर होती. तेथून मग सात्विक-चिरागला डोके वर काढण्याची संधी मिळाली नाही व परिणामी त्यांनी गेमसह लढतही गमावली.

“आम्हाला उपांत्य लढतीत लय मिळवण्यात अपयश आले. पहिल्या गेमपासून आम्ही पिछाडीवरच होतो. तिसऱ्या गेममध्येही आम्ही प्रतिस्पर्ध्यांना सहज गुण दिले. त्यांनी आम्हाला चुका करण्यास भागही पाडले. यापुढील स्पर्धेत चुका सुधारण्यावर भर देऊ,” असे चिराग पराभवानंतर म्हणाला.

एकंदर २०२५ या वर्षात भारतीय बॅडमिंटनपटूंची कामगिरी निराशाजनक राहिलेली आहे. फक्त आयुष शेट्टीच्या रुपात एकमेव भारतीय स्पर्धकाने यावर्षी एखादी स्पर्धा जिंकलेली आहे. अन्यथा भारतीय खेळाडूंना उपांत्य किंवा उपांत्यपूर्व फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

जागतिक स्पर्धेत दोन कांस्यपदके जिंकणारी सात्विक-चिराग ही भारताची पुरुष दुहेरीतील पहिलीच जोडी ठरली. आतापर्यंत मिश्र अथवा महिला दुहेरीतही एखाद्या भारतीय जोडीला अशी कामगिरी जमलेली नाही.

सात्विक-चिरागची हंगामातील कामगिरी

  • मलेशिया ओपन : उपांत्य फेरी

  • इंडिया ओपन : उपांत्य फेरी

  • इंडोनेशिया : उपांत्यपूर्व फेरी

  • जागतिक स्पर्धा : उपांत्य फेरी (कांस्यपदक)

logo
marathi.freepressjournal.in