आयपीएल ही जगातील एक उच्च दर्जाची टी-२० लीग म्हणून विख्यात झालेली असतानाच आता सौदी अरेबियाच्या सरकारने त्यांच्या देशात जगातील सर्वात श्रीमंत नवीन टी-२० लीग सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) भुरळ पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सौदी अरेबियाने आयपीएल फ्रँचायझींना जगातील सर्वात श्रीमंत लीग तयार करण्याची संधी देऊ केल्याची माहिती मिळत आहे. सौदी अरेबियाने फुटबॉल, फॉर्म्युला वन या सारख्या खेळात मोठी गुंतवणूक केल्यानंतर आता क्रिकेटमध्ये मोठी गुंतवणूक करण्याचा त्यांचा विचार आहे.
सध्याच्या भारतीय खेळाडूंना इतर देशातील लीगमध्ये सहभागी होण्यास बीसीसीआयची मनाई आहे. त्यातच आता सौदी अरेबियाच्या सरकारने त्यांच्या देशात नवीन टी-२० लीग सुरू करण्याची योजना आखली आहे. यामुळे बीसीसीआय आपल्या भूमिकेचा फेरविचार करेल, असे बोलले जात आहे.
एका वृत्तानुसार गेल्या वर्षभरापासून याबाबत चर्चा सुरू आहेत. मात्र अद्याप ठोस काही निष्पन्न झालेले नाही. या लीगला आयसीसीकडून मान्यता मिळणे गरजेचे आहे. काही दिवसांपूर्वीच आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्सले यांना सौदी अरेबियाचा क्रिकेटमध्ये देखील रस असल्याचे म्हटले होते.
आयसीसीचे अध्यक्ष बार्सले म्हणाले होते की, ‘‘सौदी अरेबियाने लक्ष घातलेल्या इतर खेळांकडे पाहिल्यास क्रिकेटमध्ये देखील त्यांचा रस दिसून येत आहे. सौदी अरेबियासाठी क्रिकेटमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. ते या खेळात मोठी गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. त्यांचे क्रिकेटमधील स्वारस्य पाहता ते याकडे लक्ष देणे स्वाभाविक आहे.'
सौदी अरेबियन क्रिकेट फेडरेशनचे अध्यक्ष प्रिन्स सौद बीन मिखाल अल-सौद यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते की, ‘‘आमचा उद्देश्य हा स्थानिक आणि सौदीमध्ये राहणाऱ्या इतर देशातील लोकांसाठी एक शाश्वत उद्योग उभारणे हा आहे. तसेच सौदी अरेबियाला जगातील एक चांगले क्रिकेटिंग डेस्टिनेशन बनविणे हा देखील आमचा उद्देश असणार आहे.’’