Asian Games 2026 : सावन बारवाल याला ऐतिहासिक रौप्य

भारताच्या २८ वर्षीय सावन बारवाल याने आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या मॅरेथॉन प्रकारात आपल्याच राष्ट्रीय विक्रमात सुधारणा करत ऐतिहासिक रौप्यपदकाची कमाई केली आहे. या कामगिरीसह भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत या क्रीडा प्रकारात तब्बल ४४ वर्षांनंतर पहिले पदक पटकावले आहे.
Asian Games 2026 : सावन बारवाल याला ऐतिहासिक रौप्य
Published on: 

नागोया : भारताच्या २८ वर्षीय सावन बारवाल याने आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या मॅरेथॉन प्रकारात आपल्याच राष्ट्रीय विक्रमात सुधारणा करत ऐतिहासिक रौप्यपदकाची कमाई केली आहे. या कामगिरीसह भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत या क्रीडा प्रकारात तब्बल ४४ वर्षांनंतर पहिले पदक पटकावले आहे. यापूर्वी भारताने १९८२ च्या नवी दिल्ली आशियाई क्रीडा स्पर्धेत होसूर कुक्कप्पा सीताराम याने जिंकलेल्या कांस्यपदकाच्या रूपाने शेवटचे पदक जिंकले होते.

हिमाचल प्रदेशच्या मंडी जिल्ह्यातील जोगिंदर नगर येथील रहिवासी आणि भारतीय सैन्यात कार्यरत असलेल्या बारवालने ४२.१९५ किलोमीटरचे अंतर २ तास ११ मिनिटे ३७ सेकंदात पूर्ण केले. जपानच्या इचिताका यामाशिता याने २ तास १० मिनिटे ४९ सेकंद वेळेसह सुवर्णपदक पटकावले. चीनच्या पेईयू फेंग याने २ तास १२ मिनिटे १३ सेकंद वेळेसह कांस्यपदकावर नाव कोरले.

आशियाई क्रीडा स्पर्धेत मॅरेथॉन पदक जिंकणारा बारवाल हा चौथा भारतीय ठरला आहे. यापूर्वी १९५१ च्या पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत छोटा सिंग याने सुवर्ण, तर सुरत सिंग माथुर याने कांस्यपदक जिंकले होते. चालू वर्षाच्या एप्रिल महिन्यात 'एनएन मॅरेथॉन' रोटरडॅममध्ये बारवालने २ तास ११ मिनिटे ५८ सेकंद वेळेसह शिवनाथ सिंग यांचा ४८ वर्षांचा राष्ट्रीय विक्रम मोडला होता. त्यानंतर आपल्या कारकिर्दीतील दुसऱ्याच मॅरेथॉन शर्यतीत त्याने पुन्हा एकदा राष्ट्रीय विक्रम नोंदवला आहे.

५ हजार आणि १० हजार मीटर व हाफ मॅरेथॉनमध्ये भाग घेतल्यानंतर तो या वर्षीच मॅरेथॉनकडे वळला होता.

वडील चालक, आई गृहिणी

बारवालचे वडील कुलदीप नवी दिल्लीत चालक म्हणून काम करत होते, तर आई सुभद्रा देवी गृहिणी आहे. वयाच्या १४ व्या वर्षी मोठ्या भावाला ट्रॅकवर पाहिल्यानंतर त्याने धावण्यास सुरुवात केली होती. २०१५ मध्ये अठरा वर्षांखालील गटात त्याने पहिल्या राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला, तर २०२१ मध्ये फेडरेशन कपमध्ये ५,००० मीटर शर्यतीद्वारे वरिष्ठ गटात पदार्पण केले. डेहराडून येथे झालेल्या २०२५ च्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत त्याने ५,००० आणि १०,००० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते. २०१९ मध्ये तो क्रीडा कोट्यातून भारतीय सैन्यात दाखल झाला होता.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in