आशिया चषकाच्या आयोजनावर शिक्कामोर्तब!

३१ ऑगस्ट ते १७ सप्टेंबरदरम्यान रंगणार स्पर्धा; पाकिस्तानमध्ये चार, श्रीलंकेत होणार नऊ लढती
आशिया चषकाच्या आयोजनावर शिक्कामोर्तब!

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

गेल्या काही महिन्यांपासून असंख्य बाबींमुळे चर्चेत असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका संयुक्तपणे ३१ ऑगस्ट ते १७ सप्टेंबरदरम्यान रंगणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन करणार असल्याचे आशियाई क्रिकेट परिषदेने (एसीसी) गुरुवारी सांगितले. पाकिस्तानमध्ये चार, तर श्रीलंकेत नऊ सामने खेळवण्यात येतील.

राजकीय संबंध तसेच खेळाडूंच्या सुरक्षेच्या कारणास्तव भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास स्पष्ट नकार दर्शवला आहे. त्यानंतर पाकिस्ताननेही भारतात होणाऱ्या विश्वचषकातून माघार घेण्याचा इशारा दिला. यादरम्यान अनेकदा चर्चा झाल्यानंतर आशिया चषकातील काही सामन्यांचे आयोजन करण्याची संधी दिली, तरच विश्वचषकासाठी भारतात येऊ असे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) सांगितले. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी हा प्रस्ताव मान्य केल्यामुळे अखेर स्पर्धेच्या आयोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतीय संघ पाकिस्तानात आशिया चषकातील एकही सामना खेळणार नाही. त्यामुळे अन्य चारपैकी कोणते संघ पाकिस्तानमध्ये जाणार, हे पाहणे रंजक ठरेल. तसेच स्पर्धेचे अधिकृत वेळापत्रकही लवकरच जाहीर करण्यात येईल.

पाकिस्तानमधील सामने लाहोर येथे खेळवण्यात येतील, तर श्रीलंकेतील लढती कँडी आणि पल्लेकल्ले येथे होतील. यंदा नेपाळ या स्पर्धेसाठी पात्र ठरला असून त्यांनी पात्रता फेरीतील अंतिम लढतीत यूएईला नमवले होते. गतवर्षी झालेल्या आशिया चषकात श्रीलंकेने पाकिस्तानला धूळ चारून जेतेपद मिळवले. भारताला सुपर-फोरमध्ये गाशा गुंडाळावा लागला होता.

आशिया चषकाचे स्वरूप

8ऑक्टोबरमध्ये एकदिवसीय विश्वचषक होणार असल्याने यंदा आशिया चषकातील सामने ५०-५० षटकांचे असतील.
8सहा संघांना दोन गटांत विभागण्यात आले असून अ-गटात भारत, पाकिस्तान, नेपाळ आणि ब-गटात अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका हे संघ आहेत.
8दोन्ही गटांतील आघाडीचे दोन संघ सुपर-फोरसाठी पात्र ठरतील. सुपर-फोरमध्ये प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध खेळेल. 8सुपर-फोर फेरीच्या अखेरीस आघाडीचे दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील.

पाकिस्तान विश्वचषकासाठी भारतात येणार

आशिया चषकाच्या आयोजनावर शिक्कामोर्तब झाल्यामुळे पाकिस्तानचा संघही विश्वचषकात भारतात येणार, हे स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने भारताच्या सामन्यांचे संभाव्य वेळापत्रक आयसीसीकडे सुपुर्द केले. त्यानुसार १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. पाकिस्तानने अहमदाबादमध्ये प्रथम खेळण्यास नकार दर्शवला होता. मात्र आता ते अहमदाबादमध्ये खेळण्यास तयार होतील, असे दिसते. त्याशिवाय स्टार स्पोर्ट्स वाहिनीनेसुद्धा होणारा तोटा लक्षात घेता आयसीसीला या दोन्ही संघांमधील सामना रद्द न करण्याविषयी खास निवेदन केल्याचे समजते. आशिया चषकात भारत-पाकिस्तान तीनदा (साखळी, सुपर-फोर आणि अंतिम फेरी) आमनेसामने येण्याची शक्यता आहे. तर विश्वचषकातसुद्धा उभय संघ दोन वेळा (साखळी फेरी आणि उपांत्य किंवा अंतिम फेरी) एकमेकांविरुद्ध उभे ठाकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in