नव्या प्रशिक्षकाचा शोध घेण्यास प्रारंभ: टी-२० विश्वचषकापूर्वीच मागवणार अर्ज; द्रविडला पुन्हा दावेदारी पेश करण्याची मुभा

राहुल द्रविडचा भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ टी-२० विश्वचषकाच्या अखेरीस संपुष्टात येणार आहे.
नव्या प्रशिक्षकाचा शोध घेण्यास प्रारंभ: टी-२० विश्वचषकापूर्वीच मागवणार अर्ज; द्रविडला पुन्हा दावेदारी पेश करण्याची मुभा

मुंबई : राहुल द्रविडचा भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ टी-२० विश्वचषकाच्या अखेरीस संपुष्टात येणार आहे. त्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आतापासूनच नव्या प्रशिक्षकाचा शोध घेण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे. आगामी टी-२० विश्वचषकापूर्वीच यासाठी अर्ज मागवण्यात येणार असल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी शुक्रवारी दिली.

२ जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे टी-२० विश्वचषक खेळवण्यात येणार असून भारतीय संघ मे महिन्याच्या अखेरीस या स्पर्धेसाठी रवाना होईल. ५१ वर्षीय द्रविडच्या प्रशिक्षण कारकीर्दीतील ही शेवटची स्पर्धा ठरू शकते. टी-२० विश्वचषकानंतर द्रविडचा कार्यकाळ समाप्त येईल. मात्र द्रविडची इच्छा असल्यास तो प्रशिक्षकपदासाठी पुन्हा अर्ज भरू शकतो, असे जय शहा यांनी नमूद केले आहे. त्यामुळे टी-२० विश्वचषकात भारताने जेतेपद काबिज केल्यास द्रविडचा कार्यकाळ वाढणार का, हे पाहावे लागेल. मुंबईत बीसीसीआयच्या मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत जय शहा यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले.

“पुढील काही दिवसांत भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासह अन्य पदांसाठीही अर्ज मागवण्यात येतील. सध्या कार्यरत असलेल्या प्रशिक्षकांच्या फळीचा कार्यकाळ टी-२० विश्वचषकानंतर संपुष्टात येईल. त्यांपैकी इच्छुक असलेले प्रशिक्षक पुन्हा एकदा विविध पदांसाठी अर्ज करू शकतात. २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत प्रशिक्षकाची नेमणूक करायची असल्याने आम्ही त्यादृष्टीने निवड करणार आहोत,” असे जय शहा म्हणाले.

द्रविडने दोन वर्षापूर्वी

मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारली. त्याच्या मार्गदर्शनाखाली भारताने २०२३चा एकदिवसीय विश्वचषक तसेच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. मात्र दोन्ही वेळेस जेतेपदाने भारताला हुलकावणी दिली. त्याशिवाय २०२२च्या टी-२० विश्वचषकातही भारताने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. मात्र आयसीसी जेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणण्यात द्रविडही अपयशी ठरला आहे. त्यामुळे आता आगामी टी-२० विश्वचषकात त्याच्याकडे सर्वांचे लक्ष असेल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ टी-२० विश्वचषक खेळणार असून ५ जून रोजी भारताचा सलामीचा सामना आयर्लंडशी होईल.

logo
marathi.freepressjournal.in