Pro Kabaddi: १८ ऑक्टोबरपासून रंगणार प्रो कबड्डी लीगचा ११वा हंगाम, तेलुगू टायटन्स आणि बंगळुरू बुल्स यांच्यात सलामीची लढत

Pro Kabaddi League Season 11: प्रो कबड्डी लीग स्पर्धेचा ११वा हंगाम १८ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. हैदराबाद येथील गचीबोवली इनडोअर स्टेडियममध्ये होणाऱ्या या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात तेलुगू टायटन्स आणि बंगळुरू बुल्स एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत.
Pro Kabaddi: १८ ऑक्टोबरपासून रंगणार प्रो कबड्डी लीगचा ११वा हंगाम, तेलुगू टायटन्स आणि बंगळुरू बुल्स यांच्यात सलामीची लढत
www.prokabaddi.com
Published on

मुंबई : प्रो कबड्डी लीग स्पर्धेचा ११वा हंगाम १८ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. हैदराबाद येथील गचीबोवली इनडोअर स्टेडियममध्ये होणाऱ्या या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात तेलुगू टायटन्स आणि बंगळुरू बुल्स एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत. तेलुगूचा पवन सेहरावत आणि बंगळुरूचा प्रदीप नरवाल यांच्यातील द्वंद्व या लढतीच्या निमित्ताने चाहत्यांना पाहायला मिळेल.

२०१४पासून सुरू झालेल्या प्रो कबड्डीमध्ये आतापर्यंत पाटणा पायरेट्सने सर्वाधिक ३ वेळा जेतेपद मिळवले आहे. गतवर्षी पुणेरी पलटणने पहिल्यांदाच या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. यंदा पुन्हा एकदा १२ संघांत जेतेपदासाठी कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. पहिल्या दिवशी होणाऱ्या दुसऱ्या लढतीत यू मुंबासमोर दंबग दिल्लीचे आव्हान असेल. या सामन्यात प्रो कबड्डीच्या इतिहासातील सर्वात महागडा भारतीय बचावपटू ठरलेला सुनील कुमार आणि दिल्लीचा नवीन कुमार यांच्यातील चुरस खास आकर्षण ठरणार आहे.

यंदा पुन्हा एकदा तीन शहरांत ही स्पर्धा खेळवण्यात येणार असून स्पर्धेच्या बाद फेरीच्या तारखा व ठिकाण काही दिवसांनी जाहीर करण्यात येतील. सध्या हैदराबाद, नोएडा आणि पुण्यातील बालेवाडी स्टेडियमवर प्रो कबड्डीच्या ११व्या हंगामाचा थरार चाहत्यांना अनुभवता येईल. गेल्या महिन्यात मुंबईत झालेल्या खेळाडूंच्या लिलाव प्रक्रियेत सचिन तन्वरवर तमिळ थलायव्हाजने सर्वाधिक २.१५ कोटींची बोली लावून खरेदी केले. तसेच प्रथमच ८ खेळाडूंनी १ कोटींचा टप्पा ओलांडल्याने यंदाच्या हंगामाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

यासंबंधी मशाल स्पोर्टसचे क्रीडा विभाग प्रमुख व प्रो कबड्डी लीगचे कमिशनर अनुपम गोस्वामी म्हणाले की, “प्रो कबड्डीचे वेळापत्रक चाहत्यांना ध्यानात ठेवूनच आखण्यात आले आहे. सर्व १२ संघांना यामुळे डावपेच आखण्याची योग्य संधी मिळेल. तसेच यावेळी कोट्यवधीपेक्षा अधिक बोली लागलेल्या खेळाडूंकडे चाहत्यांचे लक्ष विशेष लक्ष असेल.” स्टार स्पोर्ट्स क्रीडा वाहिनीवर प्रो कबड्डीचे थेट प्रक्षेपण करण्यात येईल.

सुरुवातीचे तीन टप्पे

  • १८ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर : हैदराबाद

  • १० नोव्हेंबर ते १ डिसेंबर : नोएडा

  • ३ डिसेंबर ते २४ डिसेंबर : पुणे

logo
marathi.freepressjournal.in