मुंबई खिलाडीजचा सलग दुसरा पराभव! गुजरात जायंट्स ३४-३० अशा विजयासह गुणतालिकेत अग्रस्थानी

मुंबईचा कर्णधार अनिकेत पोटेने नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण घेतले
मुंबई खिलाडीजचा सलग दुसरा पराभव! गुजरात जायंट्स ३४-३० अशा विजयासह गुणतालिकेत अग्रस्थानी
PM

भुवनेश्वर : अल्टिमेट खो-खो लीगच्या दुसऱ्या पर्वात तिसऱ्या दिवशी झालेल्या पहिल्या सामन्यात गुजरात जायंट्सने मुंबई खिलाडीजवर ३४-३० अशी सरशी साधली. कटक येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत मुंबईचा हा सलग दुसरा पराभव ठरला, तर गुजरातने सलग दुसऱ्या विजयासह गुणतालिकेत अग्रस्थानी झेप घेतली.

मुंबईचा कर्णधार अनिकेत पोटेने नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण घेतले. हा त्याचा निर्णय अतिशय योग्य ठरवत मुंबईच्या संरक्षकांनी अतिशय उत्कृष्ट खेळ करत पहिल्या फेरीत संरक्षणात ड्रीम रन्सचा १ गुण मिळवला. तर गुजरात जायंट्सने १४ गुण मिळवत खेळावर पकड मिळवली. त्यानंतर गुजराताने ड्रीम रन्सचे तीन गुण वसूल करताना मुंबईला कडवी लढत दिली. मात्र या दुसऱ्या फेरीत मुंबईला फक्त ८ गुणच मिळवता आले. यावेळी गुजरातचा कर्णधार अक्षय भांगरेने १.१२ मिनिटे, सुयश गरगटेने १.४८ मिनिटे संरक्षण केले.

तिसऱ्या फेरीत गुजरातने दमदार आक्रमण करताना १७ गुण प्राप्त करून विजयाच्या दिशेने पाऊल टाकले. गुजरातचे एकूण ३४ गुण झाल्यावर मुंबईला विजयासाठी चौथ्या फेरीत २५ गुण मिळवायचे होते. ऋषिकेश मुर्चावडे, अनिकेत यांनी जोरदार आक्रमण केले. मात्र वेळेअभावी मुंबईला २१ गुणच कमावता आले. त्यामुळे त्यांची एकूण गुणसंख्या ३० झाली व गुजरातने ४ गुणाच्या फरकाने विजय मिळवला. सुयश गरगटे सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

logo
marathi.freepressjournal.in