महिला IPL चे दुसरे पर्व, २३ फेब्रुवारी रोजी सलामीची लढत; बघा डिटेल्स

गतविजेते मुंबई इंडियन्स आणि गतउपविजेते दिल्ली कॅपिटल्स यांच्यात बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सलामीची लढत होईल, तर १७ मार्च रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर अंतिम फेरीचे आयोजन करण्यात येईल.
महिला IPL चे दुसरे पर्व, २३ फेब्रुवारी रोजी सलामीची लढत; बघा डिटेल्स

नवी दिल्ली : महिलांच्या आयपीएलचा म्हणजेच वुमेन्स प्रीमियर क्रिकेट लीगच्या (डब्ल्यूपीएल) दुसऱ्या हंगामाचा थरार यंदा बंगळुरू आणि नवी दिल्ली येथे रंगणार आहे. २३ फेब्रुवारी ते १७ मार्च दरम्यान ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. गतविजेते मुंबई इंडियन्स आणि गतउपविजेते दिल्ली कॅपिटल्स यांच्यात बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सलामीची लढत होईल, तर १७ मार्च रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर अंतिम फेरीचे आयोजन करण्यात येईल.

गतवर्षी पूर्णपणे मुंबईत मार्च महिन्यांत डब्ल्यूपीएलचा पहिला हंगाम आयोजित करण्यात आला होता. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईने अंतिम लढतीत दिल्लीला नमवून विजेतेपद पटकावले होते. मुंबईतील ब्रेबॉर्न आणि नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर सर्व सामने खेळवण्यात आले होते. गेल्या हंगामाप्रमाणेच यंदाही मुंबई, दिल्लीसह गुजरात जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि यूपी वॉरियर्स हे पाच संघ स्पर्धेत खेळतील. ९ डिसेंबर रोजी दुसऱ्या हंगामासाठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडली. त्याद्वारे असंख्य युवा तसेच विदेशी खेळाडूंना प्रथमच या स्पर्धेत खेळण्याची संधी लाभेल.

मुंबई इंडियन्सचे सामने

दिनांक प्रतिस्पर्धी संघ

 1. २३ फेब्रुवारी वि. दिल्ली कॅपिटल्स

 2. २५ फेब्रुवारी वि. गुजरात जायंट्स

 3. २८ फेब्रुवारी वि. यूपी वॉरियर्स

 4. २ मार्च वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

 5. ५ मार्च वि. दिल्ली कॅपिटल्स

 6. ७ मार्च वि. यूपी वॉरियर्स

 7. ९ मार्च वि. गुजरात जायंट्स

 8. १२ मार्च वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

स्पर्धेविषयी महत्त्वाचे

 • २२ सामने यंदाच्या हंगामात होणार असून ४ मार्चपर्यंतचे ११ सामने बंगळुरूत होतील. त्यानंतर उर्वरित ११ सामने दिल्लीत खेळवण्यात येतील.

 • एका संघाला प्रत्येकी ८ सामने खेळायचे आहेत. साखळी फेरीअखेरीस अग्रस्थानावरील संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल.

 • दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावरील संघांत ‘एलिमिनेटर’ची लढत होईल. चौथ्या व पाचव्या क्रमांकावरील संघाचे आव्हान संपुष्टात येईल.

 • सर्व सामने भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७.३० वाजता सुरू होणार असून स्पोर्ट्स १८ वाहिनी आणि जिओ सिनेमा ॲपवर सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्यात येईल.

logo
marathi.freepressjournal.in