सेमीफायनलचे तिकीट पक्के? भारताचा आज दक्षिण आफ्रिकेशी मुकाबला

सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांत पाकिस्तान आणि नेदरलँड‌्सला नमविल्याने टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढला आहे
सेमीफायनलचे तिकीट पक्के? भारताचा आज दक्षिण आफ्रिकेशी मुकाबला

टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर-१२ फेरीत रविवारी तिसरा सामना खेळण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. भारताचा मुकाबला दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. या सामन्यात विजय मिळविल्यास भारताचे सेमीफायनलचे तिकीट जवळपास पक्के होणार आहे.

सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांत पाकिस्तान आणि नेदरलँड‌्सला नमविल्याने टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला नमवून भारत उपांत्य फेरीतील स्थान पक्के करील, याची खात्री सर्वांनाच वाटत आहे. टी-२० विश्वचषकापूर्वी भारताने सप्टेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेसोबत तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-१ ने विजय मिळविला होता. त्यामुळे मानसिकदृष्ट्या रविवारच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर मोठे दडपण असणार आहे. आतापर्यंतच्या सर्वच विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघ पाच वेळा एकमेकांपुढे उभे ठाकले. त्यातील चार सामन्यांत भारताचा विजय झाला. अवघा एक सामना दक्षिण आफ्रिकेला जिंकता आला. त्यामुळे भारताचे पारडे आकडेवारीतही जड दिसत आहे. टी-२० विश्वचषकात आतापर्यंत टीम इंडियाने शानदार कामगिरी केली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या अत्यंत दबावाच्या सामन्यात के. एल. राहुल, सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा फ्लॉप ठरले; पण विराट कोहलीने अविस्मरणीय खेळी करून सामना एकहाती जिंकून दिला. नेदरलँड‌्सविरुद्धही राहुलची मात्रा चालू शकली नाही; तेव्हाही विराट कोहली तारणहार ठरला. त्याच्याकडून रविवारच्या सामन्यातही मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा यांच्याकडूनही चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे. गोलंदाजीत अर्शदीप, भुवनेश्वर, शमी यांना सातत्य राखावे लागेल. दक्षिण आफ्रिकेलाही कमी लेखून चालणार नाही. एक शक्तिशाली संघ म्हणून त्यांच्याकडे नेहमीच पाहिले जाते. क्विंटन डिकॉक, कर्णधार बावुमा व रिली रोसोसह डेव्हिड मिलर यांच्यावर प्रामुख्याने फलंदाजीची भिस्त असणार आहे. गोलंदाजीत कगिसो रबाडा, एनरिक नॉर्खिया आणि तबरेज शम्सी लयीत असल्याने भारतीय फलंदाजांना जपून खेळावे लागेल. क्षेत्ररक्षणातही हा संघ चपळ असल्याचे भानही भारतीय फलंदाजांना ठेवावे लागेल.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in