विम्बल्डन टेनिस स्पर्धेत सेरेनाने केला सलामीचा पराभव

स्पेनचा राफेल नदाल आणि ग्रीसचा स्टेफानोस त्सित्सिपास यांनी मात्र संघर्षपूर्ण विजयासह दुसरी फेरी गाठली.
विम्बल्डन टेनिस स्पर्धेत सेरेनाने केला सलामीचा पराभव
Published on

अमेरिकेच्या २३ ग्रँडस्लॅम विजेत्या सेरेना विल्यम्सवर बुधवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेत सलामीलाच पराभव पत्करण्याची नामुष्की ओढवली. स्पेनचा राफेल नदाल आणि ग्रीसचा स्टेफानोस त्सित्सिपास यांनी मात्र संघर्षपूर्ण विजयासह दुसरी फेरी गाठली.

चार ग्रँडस्लॅमपैकी सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेद्वारे ४० वर्षीय सेरेना पुनरागमन करत होती. परंतु महिला एकेरीतील पहिल्याच लढतीत फ्रान्सच्या हार्मनी टॅन या बिगरमानांकित २४ वर्षीय खेळाडूने सेरेनावर ७-५, ६-१, ७-६ (१०-७) अशी तीन सेटमध्ये सरशी साधली. यामुळे मार्गारेट कोर्ट यांच्या विक्रमी २४ ग्रँडस्लॅम जेतेपदांशी बरोबरी साधण्याचे सेरेनाचे स्वप्न पुन्हा एकदा उद्ध्वस्त झाले. गतवर्षी २९ जून, २०२१ रोजीच सेरेना कारकीर्दीतील अखेरचा सामना खेळली होती. परंतु वाढत्या वयानुसार विविध दुखापतींमुळे तिला सातत्याने स्पर्धांना मुकावे लागले. महिला एकेरीतील अन्य लढतींमध्ये, रोमानियाच्या १६व्या मानांकित सिमोना हालेपने कॅरोलिना मुकोव्हावर ६-३, ६-२ असे वर्चस्व गाजवले. पोलंडच्या अग्रमानांकित इगा स्विआटेकने क्रोएशियाच्या जॅना फेटचा ६-०, ६-३ असा फडशा पाडला. अमेरिकेच्या स्लोन स्टीफन्सला मात्र पराभवाला सामोरे जावे लागले.

पुरुष एकेरीत २२ ग्रँडस्लॅम विजेत्या दुसऱ्या मानांकित नदालने अर्जेंटिनाच्या फ्रान्सिस्को सेरनडोलोवर ६-४, ६-३, ३-६, ६-४ अशी चार सेटमध्ये मात केली. नदालची पुढील फेरीत लिथुनियाच्या रिकार्ड्स बेरांकिसशी गाठ पडेल. चौथ्या मानांकित त्सित्सिपासने स्वित्झर्लंडच्या अलेक्झांडर रिचर्डवर ७-६ (७-१), ६-३, ५-७, ६-४ असा चार सेटमध्ये विजय मिळवला. त्याच्यासमोर दुसऱ्या फेरीत ऑस्ट्रेलियाच्या जॉर्डन थॉम्पसनचे आव्हान असेल.

logo
marathi.freepressjournal.in