वेस्टर्न ॲण्ड साऊदर्न ओपन टूर्नामेंट मध्ये एमा राडूकानूकडून सेरेना विल्यम्स पराभूत

अमेरिकन खेळाडू सेरेनाची दुसरी सर्व्हिस ही अलीकडच्या काळात मोठी समस्या होती आणि तिच तिच्या पराभवाला कारणीभूत ठरली.
वेस्टर्न ॲण्ड साऊदर्न ओपन टूर्नामेंट मध्ये एमा राडूकानूकडून सेरेना विल्यम्स पराभूत

तेवीस वेळची ग्रँड स्लॅम चॅम्पियन सेरेना विल्यम्सचा वेस्टर्न ॲण्ड साऊदर्न ओपनच्या पहिल्याच फेरीत ब्रिटनच्या १९ वर्षीय एमा राडूकानूने सलग सेटमध्ये ६-४, ६-० ने पराभव केला. हा सामना एक तास पाच मिनिटे चालला. ४० वर्षीय सेरेनाची चमकदार कारकीर्द पाहणाऱ्या चाहत्यांसाठी सेरेनाचे पहिल्या फेरीत बाहेर पडणे क्लेषदायक ठरले. अमेरिकन खेळाडू सेरेनाची दुसरी सर्व्हिस ही अलीकडच्या काळात मोठी समस्या होती आणि तिच तिच्या पराभवाला कारणीभूत ठरली.

सेरेनाने पहिले ग्रँडस्लॅम जिंकले तेव्हा एमा राडुकानूचा जन्मही झाला नव्हता. सेरेनाने १९९९ मध्ये तिचे पहिले ग्रँड स्लॅम (यूएस ओपन) जिंकले होते. गेल्या आठवड्यात टोरंटो ओपनच्या दुसऱ्या फेरीत सेरेनाला बेलिंडा बेनकिचकडून पराभव पत्करावा लागला होता. २०१७ च्या ऑस्ट्रेलियन ओपननंतर सेरेनाने कोणतेही विजेतेपद जिंकलेले नाही.

या सामन्यानंतर राडुकानूने सांगितले की, ‘आपण सर्वांनी सेरेना आणि तिच्या आश्चर्यकारक कारकिर्दीचा सन्मान केला पाहिजे. अलिकडच्या काही वर्षांत सेरेनाला तिच्यापेक्षा लहान खेळाडूंकडून पराभव पत्करावे लागत आहेत. ती टोरंटो ओपनमध्ये दुसऱ्या फेरीत १५ वर्षांनी लहान असलेल्या २५ वर्षीय बेलिंडा बेनकिच हिच्याकडून पराभूत झाली होती.

विम्बल्डन २०२२ मध्ये २४ वर्षीय हार्मनी टॅनकडून ती पराभूत झाली होती. २०२१च्या विम्बल्डनमध्ये २८ वर्षीय अलेक्झांड्रा सॅस्नोविचविरुद्धच्या सामन्यात ती रिटायर्ड हर्ट झाली. २०२१ पासून तिने एकूण १० पैकी सहा सामने गमावले आहेत.

गेल्या आठवड्यात सेरेनाने लवकरच खेळातून निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर केले होते. गेल्या काही दिवसांच्या कालावधीत तिने दोन सामने खेळले आणि दोन्ही सामन्यांमध्ये तिचा सलग सेटमध्ये पराभव झाला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in