‘त्या’ सात खेळांना अखेर न्याय मिळाला! शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराच्या यादीत पुन्हा समावेश

महाराष्ट्र शासनाने मंगळवारी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांच्या पात्रता यादीतून वगळलेल्या सातही पुरस्कारांचा पुन्हा एकदा त्या यादीत समावेश केला.
‘त्या’ सात खेळांना अखेर न्याय मिळाला! शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराच्या यादीत पुन्हा समावेश

मुंबई : महाराष्ट्र शासनाने मंगळवारी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांच्या पात्रता यादीतून वगळलेल्या सातही पुरस्कारांचा पुन्हा एकदा त्या यादीत समावेश केला.

१ जानेवारीला कॅरम, शरीरसौष्ठव, पॉवरलिफ्टिंग, बिलियर्ड्स, स्नूकर, गोल्फ, अश्वारोहण या सात खेळांना विविध कारणे देत पुरस्काराच्या गणनेसाठी ग्राह्य न धरण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत झालेल्या निर्णयात या खेळांना पुन्हा समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पात्र क्रीडा प्रकारांच्या यादीतून वगळण्यात आलेल्या खेळांच्या संघटनांनी त्यांच्या खेळांचा समावेश करण्याबाबत क्रीडा संचालनालयास पत्रव्यवहार केला होता. या निर्णयास विरोध दर्शविण्याकरिता दादर येथे निषेध सभेचे आयोजनही करण्यात आले होते. त्या अनुषंगाने मंत्रालयात पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, क्रीडा विभागाचे आयुक्त सुहास दिवसे, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव नामदेव शिरगावकर यांच्यासह सात क्रीडा प्रकारांचे विविध प्रतिनिधी तसेच संघटक उपस्थित होते.

“कोणताही खेळाडू तो खेळत असलेल्या क्रीडा प्रकारात यश मिळविण्यासाठी त्याची उमेदीची वर्षे खर्च करतो. तसेच मेहनतीच्या जोरावर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर राज्यासह देशाचे नाव उज्ज्वल करतो. अशा खेळाडूंच्या क्रीडा क्षेत्रातील कार्याचा गौरव करण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने शिवछत्रपती पुरस्कार देण्यात येतात. पुरस्काराच्या सुधारित शासन निर्णयातून पात्र क्रीडाप्रकारांच्या यादीतील सात प्रकारांना वगळण्यात आले होते. या खेळांचा पुन्हा यादीत समावेश करण्यासह जिम्नॅस्टिक खेळामधील उपप्रकार एरोबिक्स व ॲक्रोबॅटिक्स या प्रकारांचाही पात्र यादीत सामावेश करावा,” असे आदेश पवार यांनी दिले.

अर्जाच्या मुदतीत वाढ

२०२२-२३ या वर्षातील पुरस्कारासाठी क्रीडा विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यांची मुदत २२ जानेवारीपर्यंतच होती. ही मुदत पुन्हा वाढवून या नव्याने समाविष्ट केलेल्या खेळांसाठीचे अर्ज ऑनलाईन मागवण्याच्या सूचना पवार यांनी दिल्या.

logo
marathi.freepressjournal.in