
मुंबई : इराणच्या मोहम्मदरेझा शादलुईने सलग तिसऱ्या वर्षी २ कोटींहून अधिक रक्कम मिळवताना प्रो कबड्डी लीगच्या १२ व्या मोसमासाठी पार पडलेल्या लिलावाचा सर्वोच्च मानकरी ठरण्याचा मान मिळवला. गेल्या मोसमातील मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेअर हा मान मिळवणाऱ्या शादलुईला गुजरात जायंट्स संघाने २.२३ कोटी रुपयांना खरेदी केले. सलग तिसऱ्या वर्षी हा मान मिळवणारा तो पहिलाच खेळाडू ठरला.
देवांक दलाल हा २ कोटींहून अधिक रक्कम मिळवणारा दुसरा खेळाडू ठरला. गेल्या मोसमात सर्वोत्तम चढाईपटू ठरलेल्या देवांकला बंगाल वॉरियर्स संघाने २.२०५ कोटी रुपयांना खरेदी केले. पीकेएल इतिहासातील तो पाचव्या क्रमांकाचा सर्वात महागडा खेळाडू ठरला.
पीकेएलच्या १२व्या मोसमाच्या लिलावात फायनल बीड मॅच (एफबीएम) हा नियम लक्षवेधी ठरला. या नियमानुसार कोणत्याही संघाला त्यांनी रिलीज केलेला खेळाडू एक किंवा दोन मोसमासाठी त्याच्या अंतिम लिलाव रकमेला पुन्हा खरेदी करता येणार आहे. या नियमाचा वापर करून दबंग दिल्ली के. सी. संघाने आपला स्टार चढाईपटू आशू मलिकला पुढच्या दोन मोसमांसाठी १.९० कोटी रुपयांना पुन्हा खरेदी केले.
‘अ’ गटातील सर्वाधिक किंमत मिळालेल्या अन्य खेळाडूंमध्ये तमिळ थलाइवाज संघाने अर्जुन देशवाल याला १.४०५ कोटी रुपयांना खरेदी केले. तर, बंगळुरू बुल्स संघाने योगेश दहियाला १.१२५ कोटी रुपयांना खरेदी केले.