शफाली वर्माला ICC ची तंबी; झेल सोडल्यानंतर चेंडू जमिनीवर फेकणे भोवले

झेल सोडल्यानंतर वैतागून चेंडू जमिनीवर फेकल्याप्रकरणी भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार शफाली वर्मा हिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) अधिकृत तंबी देण्यात आली आहे. रविवारी रायपूर येथे झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात हा प्रकार घडला.
शफाली वर्माला ICC ची तंबी; झेल सोडल्यानंतर चेंडू जमिनीवर फेकणे भोवले
शफाली वर्माला ICC ची तंबी; झेल सोडल्यानंतर चेंडू जमिनीवर फेकणे भोवलेx
Published on: 

दुबई : झेल सोडल्यानंतर वैतागून चेंडू जमिनीवर फेकल्याप्रकरणी भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार शफाली वर्मा हिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) अधिकृत तंबी देण्यात आली आहे. रविवारी रायपूर येथे झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात हा प्रकार घडला. या सामन्यात भारताने नऊ गडी राखून विजय मिळवला होता.

२२ वर्षीय शफालीने आयसीसीच्या आचारसंहितेच्या स्तर-१ चे उल्लंघन केल्याचे आढळले. आयसीसीने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ही माहिती दिली. खेळाडू आणि खेळाडूंच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या आयसीसीच्या आचारसंहितेतील कलम २.२ नुसार, आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान क्रिकेटचे साहित्य, खेळाडूंचे कपडे, मैदानावरील उपकरणे किंवा इतर साहित्याचा गैरवापर करणे हा दंडनीय प्रकार आहे. शफालीने या कलमाचे उल्लंघन केल्याचे आयसीसीने म्हटले आहे. या कारवाईमुळे शफालीच्या शिस्तभंगाच्या नोंदीत एक डिमेरिट गुणही जमा करण्यात आला आहे. गेल्या २४ महिन्यांतील हा तिचा पहिलाच अपराध आहे. झिम्बाब्वेच्या डावातील १२व्या षटकात श्री चरणीच्या गोलंदाजीवर चिपो मुगेरी-तिरिपानो हिचा मिड-ऑफला झेल घेण्यात शफालीला अपयश आले. त्यानंतर वैतागून तिने चेंडू जमिनीवर फेकला.

आयसीसीच्या आचारसंहितेच्या स्तर १ मधील उल्लंघनासाठी किमान अधिकृत तंबी, तर कमाल सामन्याच्या मानधनाच्या ५० टक्क्यांपर्यंत दंड आणि एक किंवा दोन डिमेरिट गुणांची तरतूद आहे.

शफाली सध्या जबरदस्त फॉर्मात असून तिच्याकडून चांगली कामगिरी होत आहे. मात्र शफालीने रागावर नियंत्रण मिळवावे, अशी अपेक्षा माजी खेळाडूंकडून व्यक्त केली जात आहे.

शफालीकडून चूक मान्य

शफालीने आपली चूक मान्य केली आणि आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय सामनाधिकारी पॅनेलमधील जी. एस. लक्ष्मी यांनी सुचवलेली शिक्षा स्वीकारली. त्यामुळे या प्रकरणी औपचारिक सुनावणी घेण्याची आवश्यकता भासली नाही. मैदानावरील पंच वृंदा राठी आणि गायत्री वेणुगोपालन, तिसऱ्या पंच अ‍ॅना हॅरिस आणि चौथ्या पंच जननी नारायणन यांनी शफालीवर आचारसंहितेच्या उल्लंघनाचा आरोप ठेवला होता.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in