शेरॉनचा दुहेरी सुवर्ण धडाका: ५० मीटर रायफल थ्री प्रकारात सांघिक व एकेरीत पदक; ऐश्वर्यला रौप्य

शेरॉनने पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री प्रकारातील एकेरी गटात ४६०.२ गुणांसह सुवर्ण काबिज केले.
शेरॉनचा दुहेरी सुवर्ण धडाका: ५० मीटर रायफल थ्री प्रकारात सांघिक व एकेरीत पदक; ऐश्वर्यला रौप्य

जकार्ता : भारताचा २८ वर्षीय नेमबाज अखिल शेरॉनने शुक्रवारी दुहेरी सुवर्णपदकांवर निशाणा साधला. शेरॉनने पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारात एकेरीत सोनेरी यश मिळवले. त्यानंतर ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर व स्वप्निल कुसळे यांच्या साथीने त्याने सांघिक गटातही सुवर्ण पटकावले.

जकार्ता येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत ऑलिम्पिक पात्रतेच्या दृष्टीने नेमबाजांची कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे. शेरॉन आधीच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला आहे. तसेच या स्पर्धेद्वारे आतापर्यंत भारताचे ३ नेमबाज पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेले असून एकूण भारतीय नेमबाजांचा आकडा १६ पर्यंत उंचावलेला आहे. स्पर्धेच्या पाचव्या दिवशीहीच भारताने पदकांची लयलूट कायम राखताना तीन पदके प्राप्त केली. त्यामुळे भारताने २६ पदकांसह तालिकेतील अग्रस्थान टिकवून ठेवले आहे.

शेरॉनने पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री प्रकारातील एकेरी गटात ४६०.२ गुणांसह सुवर्ण काबिज केले. भारताच्याच ऐश्वर्यने या प्रकारात रौप्य कमावताना ४५९.० गुण मिळवले. थायलंडचा नेमबाज तिसऱ्या स्थानी राहिला. पात्रता फेरीत ऐश्वर्य ५८८ गुणांसह तिसऱ्या, तर शेरॉन ५८६ गुणांसह सहाव्या स्थानी होता. मात्र अंतिम फेरीत शेरॉनने कामगिरी उंचावली. त्यानंतर सांघिक प्रकारात शेरॉन, ऐश्वर्य व स्वप्निल यांच्या त्रिकुटाने १,७५८ गुणांसह अग्रस्थान पटकावत सुवर्णपदकाला गवसणी घातली. चायनीज तैपई व दक्षिण कोरियाचे संघ अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी राहिले.

logo
marathi.freepressjournal.in