World Archery Para Ch’ships 2025 : शितल देवीचा सुवर्ण वेध

भारताची १८ वर्षीय तिरंदाज शितल देवीने तुर्कीच्या ओझनूर क्युणर गिर्डीला पराभवाचे पाणी पाजत जागतिक पॅरा आर्चरी स्पर्धेत शनिवारी महिल्यांच्या कम्पाऊंड वैयक्तिक गटात ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी केली.
World Archery Para Ch’ships 2025 : शितल देवीचा सुवर्ण वेध
Published on

ग्वांगजू (दक्षिण कोरिया) : भारताची १८ वर्षीय तिरंदाज शितल देवीने तुर्कीच्या ओझनूर क्युणर गिर्डीला पराभवाचे पाणी पाजत जागतिक पॅरा आर्चरी स्पर्धेत शनिवारी महिल्यांच्या कम्पाऊंड वैयक्तिक गटात ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी केली.

या गटात शितल ही हात नसलेली एकमेव भारतीय तिरंदाज होती. पाय आणि हनुवटीच्या मदतीने तिने बाण सोडत सुवर्णपदकावर मोहोर उमटवली.

एकेरीचा अंतिम सामना अत्यंत अटीतटीचा झाला. या सामन्यात शितलने सातत्यपूर्ण खेळ केला. पहिली फेरी २९-२९ अशी बरोबरीत सुटली. मात्र दुसऱ्या फेरीत शितलने ३ वेळा १० गुण मिळवले आणि ३०-२७ अशी आघाडी घेतली.

तिसरी फेरीही २९-२९ अशी बरोबरीत सुटली. चौथ्या फेरीत शितल थोडीशी मागे पडली. तिने या फेरीत २८ गुण मिळवले. गिर्डीने २९ गुणांसह ही फेरी जिंकली. चौथ्या फेरी अखेर शितलकडे ११६-११४ अशी २ गुणांनी आघाडी होती.

पाचव्या आणि अखेरच्या फेरीत रणर्थी शितलने ३ अचूक बाण मारत ३० गुण मिळवले. या कामगिरीसह तिने पहिलेवहिले सुवर्णपदक आपल्या नावे केले.

दरम्यान, उपांत्य फेरीच्या लढतीत जम्मू-काश्मिरच्या या तिरंदाजाने ग्रेट ब्रिटनच्या जोडी ग्रिनहॅमला १४५-१४० असे पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

सांघिक ओपनच्या अंतिम सामन्यात शितल आणि सरिता यांनी दमदार सुरुवात केली होती. पण त्यांना १४८-१५२ असा ४ गुणांनी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

भारतीय जोडीने सुरुवातीला शानदार प्रदर्शन करत तुर्कीच्या ओझनुर क्युरे गिर्डी आणि बुरसा फात्मा युन या जोडीविरुद्ध पहिल्या फेरीत ३८-३७ अशी आघाडी घेतली. त्यानंतर सामना दोलायमान स्थितीत होता.

स्पर्धेतील तिसरे पदक

स्पर्धेतील शितलचे हे तिसरे पदक आहे. तिने कम्पाऊंड प्रकारातील मिश्र गटात तोमन कुमारच्या साथीने कांस्यपदक जिंकले आहे. ब्रिटनच्या जॉडी ग्रिनहॅम आणि नॅथन मॅकक्विन या जोडीला १५२-१४९ असे पराभूत करून शितल आणि तोमन यांनी कांस्यपदक पटकावले. कम्पाऊंडमध्ये महिला ओपन सांघिक प्रकारात शितल आणि सरिता यांनी अंतिम फेरीत तुर्कीच्या संघाला पराभूत करून रौप्यपदक आपल्या नावे केले.

logo
marathi.freepressjournal.in