

जयपूर : भारताची धडाकेबाज सलामीवीर शफाली वर्मा हिने आयसीसी महिला टी-२० क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत गगनभरारी घेतली. याआधी अग्रस्थान भूषवणाऱ्या शफालीने यावेळी मात्र चार क्रमांकाने झेप घेत सहाव्या स्थानी मजल मारली आहे. गोलंदाजीत रेणुका सिंग ठाकूर हिनेही दमदार कामगिरी करत सहावे स्थान प्राप्त केले आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत दमदार कामगिरी केल्याचे फळ शफाली वर्माला मिळाले. एकीकडे भारतीय संघाबाहेर फेकल्या गेलेल्या शफालीने श्रीलंकेविरुद्ध आपल्या कर्तृत्वाची झलक दाखवत भारतीय संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यामुळेच तिला चार स्थानांनी मुसंडी मारता आली. फलंदाजांमध्ये उपकर्णधार स्मृती मानधना हिने तिसरे स्थान कायम राखले असून शफाली आता सहाव्या स्थानी पोहोचली आहे. याआधी शफाली २०२०मध्ये अग्रस्थानी होती, मिताली राज हिच्यानंतर टी-२० क्रिकेटमध्ये अव्वल स्थान प्राप्त करणारी शफाली ही भारताची पहिली महिला फलंदाज ठरली होती.
२१ वर्षीय शफालीने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात ३४ चेंडूंत नाबाद ६९ धावा फटकावल्या होत्या. त्यानंतरच्या सामन्यात तिने ४२ चेंडूंत नाबाद ७९ धावांची खेळी साकारली होती. त्यानंतर थिरूवनंतपुरम येथील चौथ्या टी-२० सामन्यात तिने ४६ चेंडूंत ७९ धावा तडकावल्या होत्या. शफालीने आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ८७ धावांची खेळी करत दोन विकेट्स मिळवले होते. त्यामुळे भारताला पहिल्यांदाच वनडे विश्वचषकाचे जेतेपद पटकावता आले होते. आता टी-२० प्रक्रारातही तिची जबरदस्त घोडदौड सुरू आहे. आता अग्रस्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या बेथ मूनीपेक्षा ती फक्त ६० रेटिंग गुणांनी मागे आहे.
स्मृती मानधना सध्या खराब फॉर्मात असली तरी चौथ्या टी-२० सामन्यात ८० धावा फटकावल्यामुळे तिला आपले तिसरे स्थान कायम राखता आले. भरवशाची फलंदाज जेमिमा रॉड्रिग्जच्या क्रमवारीत मात्र एका स्थानाने घसरण झाली असून ती १०व्या स्थानी पोहोचली आहे. भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा गोलंदाजांच्या यादीत अग्रस्थानी कायम असून रेणुका सिंग ठाकूर हिने ‘टॉप-१०’ गोलंदाजांमध्ये एंट्री घेतली आहे. रेणुकीने तिसऱ्या सामन्यात चार विकेट्स मिळवले होते, त्यामुळे तिने आठ क्रमांकाच्या सुधारणेसह सहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत दीप्ती शर्मा ३८७ रेटिंग गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. सध्या दीप्तीकडे १५१ विकेट्स जमा असले तरी महिला टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्सचा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी तिला फक्त एका बळीची आवश्यकता आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये वेस्ट इंडिजची हेली मॅथ्यूज ५०५ गुणांसह अग्रस्थानी आहे. तर न्यूझीलंडच्या अमेलिया केर हिने ४३४ गुणांसह दुसरे स्थान प्राप्त केले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी केल्याचे फळ भारतीय खेळाडूंना मिळाले.
रिचा घोषच्या क्रमवारीत कमालीची सुधारणा
रिचा घोष हिने टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत लक्षणीय सुधारणा करत सात स्थानांनी मुसंडी मारली आहे. त्यामुळे ती २०व्या स्थानी पोहोचली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात तिने नाबाद ४० धावांची खेळी केली होती. डावखुरी फिरकीपटू श्री चरणी हिने १७ क्रमांकाने झेप घेत ५२वे स्थान प्राप्त केले आहे. वैष्णवी शर्मा हिने पदार्पणाच्या आंतरराष्ट्रीय मालिकेत सुरेख कामगिरी करत ३९० क्रमांकाने मुसंडी मारत १२४वे स्थान प्राप्त केले आहे.