मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदासाठी जय शहा यांनी अर्ज भरला आणि ते निवडून आले, तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळात (बीसीसीआय) सचिव म्हणून त्यांची जागा कोण घेणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामध्ये सध्याचे बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला, कोषाध्यक्ष आशिष शेलार आणि आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमाळ हे प्रमुख दावेदार असू शकतात.
‘आयसीसी’च्या नव्या अध्यक्षांचा कार्यकाळ १ डिसेंबरपासून सुरू होणार असून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २७ ऑगस्टपर्यंतची मुदत आहे. जय शहा अध्यक्षपदासाठी अर्ज भरणार का, हे अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी ‘आयसीसी’ मंडळातील १६ पैकी १५ सदस्यांचा त्यांना पाठिंबा असल्याची माहिती आहे. ‘बीसीसीआय’चे सचिव म्हणून शहा यांचा सध्या सलग दुसरा कार्यकाळ सुरू असून आणखी एक वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. मात्र, ‘आयसीसी’मध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यास शहा यांना ‘बीसीसीआय’मधील आपले पद सोडावे लागेल. तसे झाल्यास त्यांची जागा कोण घेऊ शकेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
शुक्ला हे सध्या उपाध्यक्ष असल्याने वर्षभरासाठी सचिवपद सांभाळणे त्यांना सर्वांत सोपे जाईल असा अंदाज आहे. तसेच सहसचिव देवजित सैकिया हेसुद्धा शर्यतीत असू शकतील. युवा प्रशासकांमध्ये दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहन जेटली, बंगाल क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष अविषेक दालमिया, पंजाबचे दिलशेर खन्ना, गोव्याचे विपुल फडके आणि छत्तीसगडचे प्रभतेज भाटिया यांची नावेही चर्चेत येऊ शकतील.