Shikhar Dhawan: ‘गब्बर’चा अलविदा! शिखर धवनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

Shikhar Dhawan announces Retirement: 'गब्बर' या नावाने क्रिकेटजगतात प्रसिद्ध असलेला भारताचा वरिष्ठ क्रिकेटपटू शिखर धवन याने शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला.
Shikhar Dhawan: ‘गब्बर’चा अलविदा! शिखर धवनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
Published on

नवी दिल्ली : 'गब्बर' या नावाने क्रिकेटजगतात प्रसिद्ध असलेला भारताचा वरिष्ठ क्रिकेटपटू शिखर धवन याने शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. जवळपास दोन वर्षांपासून भारतीय संघाबाहेर असलेल्या धवनने देशांतर्गत क्रिकेटमधूनही निवृत्ती घेण्याचे जाहीर केले असले तरी तो २०२५च्या आयपीएलमध्ये खेळणार की नाही, याची स्पष्टता केलेली नाही.

३८ वर्षीय धवनने २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. २०२२मध्ये बांगलादेशविरुद्ध तो अखेरचा वनडे सामना खेळला होता. "क्रिकेटच्या प्रवासातील माझा एक अध्याय मी इथेच संपवत आहे. या प्रवासातील अनेक संस्मरणीय क्षण आणि कृतज्ञता माझ्यासोबत आहेत. तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल खूप खूप आभार. जय हिंद," असे म्हणत धवनने 'एक्स' वर आपल्या निवृत्तीची घोषणा केली.

"आयुष्यात एका पानावरून दुसऱ्या पानावर जाणे सर्वात महत्त्वाचे असते. त्यामुळेच मी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती पत्करत आहे. क्रिकेटला अलविदा करताना, माझ्या मनात प्रदीर्घ काळ देशाचे प्रतिनिधित्व केल्याचे समाधान असेल," असेही त्याने म्हटले आहे.

धवनने १६७ वनडे सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व करताना ४४.११च्या सरासरीने ६७९३ धावा केल्या आहेत. त्यात १७ शतके आणि ३९ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने ३४ कसोटींत ७ शतकांसह २३१५ धावा केल्या आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये त्याने ६८ सामन्यांत ११ अर्धशतकांसह १७५९ धावा केल्या आहेत. मात्र दुखापतींचा लागलेला ससेमिरा, खराब फॉर्म आणि शुभमन गिल व यशस्वी जैस्वाल यांसारख्या युवा खेळाडूंच्या आगमनामुळे धवनला गेल्या काही वर्षांत भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही.

"सध्या मी आयुष्याच्या अशा टप्प्यावर उभा आहे, तिथून मागे वळून पाहताना, माझ्या डोळ्यासमोर फक्त आठवणीच तरळतात. जेव्हा मी भविष्याकडे पाहतो, तेव्हा मला नवे जग समोर दिसते. भारतीय संघाकडून खेळणे, हेच माझे एकमेव ध्येय होते, ते आता पूर्ण झाले आहे. मी दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन (डीडीसीए), बीसीसीआय आणि माझ्या चाहत्यांचा मी आभारी आहे. त्यामुळे मी स्वतःलाच सांगतो की, निराश होऊ नकोस, तुला आता परत भारताकडून खेळता येणार नाही. मात्र मी बरीच वर्षे देशाकडून खेळल्याचे समाधान आहे. आणि तीच माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे," असेही त्याने म्हटले आहे. दिल्लीच्या शिखर धवनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार सुरुवात करता आली नव्हती. दोन वेळा शून्यावर बाद झाल्याने सुरुवातीला त्याला भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी कसरत करावी लागली होती. मात्र २०१३मध्ये भारतीय संघात पुनरागमन केल्यानंतर त्याने तिन्ही प्रकारात टीम इंडियामध्ये आपले स्थान निश्चित केले. इंग्लंडमध्ये रंगलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयात त्याचा मोलाचा वाटा होता, याच स्पर्धेत त्याने स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला होता. मोहालीमध्ये कसोटी पदार्पण करतानाच, त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १८५ धावांची खेळी साकारली होती. त्याने ८५ चेंडूंतच आपले शतक साजरे केले होते. या सामन्यात पहिल्याच चेंडूवर धवन बाद झाला होता. मिचेल स्टार्कचा चेंडू हातातून सटकून थेट यष्ट्यांवर आदळला होता. त्यावेळेला नॉन-स्ट्राइकला उभा असलेला धवन यष्ट्यांपासून दूर होता. मात्र ऑस्ट्रेलियाने कोणताही अपील न केल्यामुळे धवनने मिळालेल्या जीवदानाचा फायदा उठवत कसोटी पदार्पणात वेगवान शतक झळकावण्याचा विक्रम केला होता.

इतरांना मदत करणारा तसेच झेल पकडल्यानंतर मांडीवर हात मारून कबड्डीपटूंप्रमाणे जल्लोष करणारा मैदानावरील धवन सर्वांनाच आठवत राहील. रोहित शर्मासोबत सलामीला त्याची जोडी चांगलीच रंगली होती. "भारताकडून खेळणे हेच माझे एकमेव ध्येय होते. ते स्वप्न प्रत्यक्षात साकार झाल्यामुळे मला अनेकांचे आभार मानायचे आहेत. सर्वप्रथम माझे कुटुंबिय आणि लहानपणीचे प्रशिक्षक तारक सिन्हा आणि मदन शर्मा. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला भरपूर क्रिकेट शिकायला मिळाले. त्यानंतर माझे भारतीय संघातील सहकारी. त्यांच्याबरोबर मला अनेक वर्षे देशाची सेवा करण्याची संधी मिळाली. तेच माझे दुसरे कुटुंब होते, त्यांच्या पाठिंबा आणि प्रेम यामुळे मला इथवर मजल मारता आली," असेही त्याने सांगितले.

कारकीर्दीतील प्रमुख क्षण

  • एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान ६ हजार धावा करण्याचा मान शिखर धवनने पटकावला आहे. त्याने १४१ सामन्यांत हे ‘शिखर’ सर केले आहे.

  • वनडे क्रिकेटमध्ये ५ हजार धावा आणि ५० बळी मिळवणाऱ्यांच्या यादीतही त्याने स्थान पटकावले आहे.

  • २००४च्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू तसेच २०१३च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आणि २०१८च्या आशिया चषक स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार त्याने आपल्या नावावर केला आहे.

भारताचा सलामीवीर असलेल्या शिखर धवनने गेल्या अनेक वर्षांपासून अव्वल कामगिरी केली आहे. बधाई हो शिख्खी. मोहालीमध्ये माझी जागा घेतल्यानंतर तू मागे वळून पाहिले नाहीस. गेल्या अनेक वर्षांपासून तुझी दमदार कामगिरी सुरूच आहे. आयुष्याच्या पुढच्या टप्प्यातही तू असाच आनंद घेत राहशील, अशी अपेक्षा. तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

- वीरेंद्र सेहवाग, भारताचा माजी सलामीवीर

तुला पुढील भवितव्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुझ्यासारखा तूच एकमेव शिखी पा. क्रिकेटमधील उत्तुंग कामगिरीबद्दल तुझे खूप अभिनंदन.

- हार्दिक पंड्या, भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू

धवन भविष्यात यापुढेही आपल्या आयुष्यात असाच आनंद निर्माण करेल, अशी खात्री आहे. क्रिकेटमधील उल्लेखनीय योगदानाबद्दल तुझे खूप आभार.

- गौतम गंभीर, भारताचा मुख्य प्रशिक्षक

मोठ्या स्पर्धांमधील धमाकेदार माणूस. अपेक्षेइतके कौतुक त्याच्या वाट्याला कधी आलेच नाही, पण त्याची कधी त्याने पर्वाही केली नाही. संघ जिंकणे हेच उद्दिष्ट ठेवून त्याने आपल्या वाट्याच्या टाळ्या मिळवल्या. भविष्यातील दुसऱ्या इनिंगसाठी तुला खूप खूप शुभेच्छा.

- वासिम जाफर, भारताचा माजी क्रिकेटपटू

आयपीएलमध्ये ठरला सरस

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा शिखर धवन आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी खेळाडू ठरला आहे. त्याने आयपीएलच्या २२२ सामन्यांत दोन शतके आणि ५१ अर्धशतकांसह ६७६९ धावा केल्या आहेत. एका मोसमात सर्वाधिक ७६८ धावा फटकावण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे. तसेच लागोपाठ दोन शतके झळकावण्याची किमयाही त्याने केली आहे. २०१६मध्ये आयपीएल विजेत्या सनरायजर्स हैदराबाद संघाचा तो प्रमुख भाग होता. त्याचबरोबर धवनने आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स या संघाचेही प्रतिनिधित्व केले आहे. त्याचबरोबर तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्ली आणि पंजाबकडूनही खेळला आहे. यंदाच्या मोसमात तो पंजाबकडून फक्त पाच सामने खेळला होता, त्यानंतर त्याला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले होते.

logo
marathi.freepressjournal.in