वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे सामन्यात संघाची घोषणा,शिखर धवनकडे कर्णधारपदी

गेल्या वर्षी श्रीलंका दौऱ्यावर धवनने तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले होते.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे सामन्यात संघाची घोषणा,शिखर धवनकडे कर्णधारपदी

इंग्लंड दौरा संपल्यानंतर सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यात रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय संघाचे नेतृत्व एका शिखर धवन करणार आहे. या दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामने होणार आहेत. त्यापैकी एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बुधवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघाची घोषणा केली. शिखर धवनकडे कर्णधारपद, तर रवींद्र जडेजाकडे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. निवडण्यात आलेल्या १६ सदस्यीय संघातून रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, मोहम्मद शमी आणि दुखापतग्रस्त के. एल. राहुल यांना विश्रांती दिल्याचे सांगण्यात आले. गेल्या वर्षी श्रीलंका दौऱ्यावर धवनने तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले होते. त्यावेळी इतर वरिष्ठ खेळाडू इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळण्यात व्यग्र होते. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेमध्ये ऋतुराज गायकवाड किंवा शुभमन गिल यापैकी एकासोबत धवन सलामीला यावे लागेल.

ऋषभ पंतच्या जागी संजू सॅमसन किंवा ईशान किशन यांच्यावर यष्टीरक्षणाची जबाबदारी राहील. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचाही संघात समावेश करण्यात आला आहे. रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल यांच्यासह अष्टपैलू दीपक हुडादेखील फिरकी गोलंदाजीची जबाबदारी सांभाळताना दिसेल.

भारताच्या वेस्ट इंडिज आणि अमेीरका दौऱ्याची सुरुवात २२ जुलैपासून होणार आहे. सुरुवातीला एकदिवसीय मालिका खेळवली जाईल. त्रिनिदाद येथील सामन्याने मालिकेची सुरुवात होईल. त्यानंतर पाच टी-२० सामन्यांची मालिका होईल. टी २० मालिकेतील शेवटचे दोन सामने अमेरिकेमध्ये होणार आहेत.

भारतीय संघ : शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in