मुंबई : यंग भारत सेवा मंडळातर्फे आयोजित कुमार गटाच्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत शिवमुद्रा प्रतिष्ठानने विजेतेपद मिळवले. अंतिम फेरीत त्यांनी सिद्धीप्रभा संघावर ४०-२३ असे सहज वर्चस्व गाजवले. विशाल लाड स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराचा मानकरी ठरला.
प्रभादेवी येथील राजाभाऊ साळवी मैदानावर झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात शिवमुद्राने मध्यंतरालाच २३-७ अशी आघाडी मिळवली होती. विशाल, विवेक चव्हाण यांच्या तुफानी चढाया व ऋत्विक तांबेच्या पकडींच्या बळावर त्यांनी दुसऱ्या सत्रातही कामगिरीत सातत्य राखून यश संपादन केले. सिद्धीप्रभाकडून सिद्धेश भोसले, अजिंक्य सुर्वे यांनी कडवी झुंज दिली.
विजेत्यांना ७ हजार रुपये तसेच स्व. सतीशचंद्र फणसेकर चषक देऊन गौरवण्यात आले. तर सिद्धीप्रभा संघाला ५ हजारांसह स्व. वंदना नाईक चषक प्रदान करण्यात आला. विशालला ३ हजार रुपये व सायकल देऊन सन्मानित करण्यात आले. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या एसएसजी फाऊंडेशन आणि विजय क्लबला प्रत्येकी ३ हजार रुपये देण्यात आले. तसेच अन्य वैयक्तिक पुरस्कार विजेत्यांनाही रोख रकमेसह आकर्षक भेटवस्तू देण्यात आली.