
अहमदाबाद : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली मुंबईने नुकताच सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद काबिज केले. त्यानंतर आता एकदिवसीय प्रकारातही मुंबईचा संघ छाप पाडण्यास सज्ज आहे. शनिवारपासून देशभरातील विविध शहरांत विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे ३२वे पर्व सुरू होणार आहे. त्यामुळे मुंबईला हंगामातील तिसऱ्या जेतेपदाची संधी असून या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात मुंबईसमोर कर्नाटकचे कडवे आव्हान असेल.
मार्चमध्ये अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने रणजी स्पर्धा जिंकली होती. मात्र त्याचा समावेश २०२३-२४च्या हंगामात केला जातो. ऑक्टोबर महिन्यात इराणी चषकाद्वारे यंदाच्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांचा हंगाम सुरू झाला. त्यामध्ये मुंबईनेच अजिंक्यच्या नेतृत्वात बाजी मारली. त्यानंतर मग श्रेयसच्या नेतृत्वात मुंबईने १५ डिसेंबर रोजी मुश्ताक अली करंडक उंचावला. आता २१ डिसेंबर ते १८ जानेवारी या कालावधीत रंगणाऱ्या विजय हजारे स्पर्धेत जेतेपद मिळवल्यास मुंबईची यंदाच्या हंगामातील जेतेपदाची हॅटट्रिक साकारली जाईल. तसेच रणजीचा २०२४-२५चा हंगामही अद्याप सुरू असून विजय हजारे स्पर्धेनंतर दुसरा टप्पा सुरू होणार आहे.
दरम्यान, श्रेयसच्या मुंबईच्या संघातून पृथ्वी शॉला डच्चू देण्यात आला आहे. २०२०-२१मध्ये पृथ्वीच्याच नेतृत्वात मुंबईने विजय हजारे स्पर्धा जिंकली होती. तसेच मुश्ताक अली स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या रहाणेला या स्पर्धेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. मात्र सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, शार्दूल ठाकूर असे भारतीय संघाकडून खेळणारे खेळाडू मुंबईचा भाग आहेत. त्याशिवाय आयुष म्हात्रे, तनुष कोटियन, सूर्यांश शेडगे या युवा खेळाडूंवरही लक्ष्य असेल. अनुभवी सिद्धेश लाडचे संघात पुनरागमन झाले आहे. मुंबई-कर्नाटक लढत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सकाळी ९ वाजता सुरू होईल. मयांक अगरवाल कर्नाटकचे नेतृत्व करणार आहे. मुंबईचा क-गटात समावेश करण्यात आला असून ते साखळी फेरीत ७ सामने खेळतील.
मुंबईचा संघ
श्रेयस अय्यर (कर्णधार), आयुष म्हात्रे, अंक्रिश रघुवंशी, जय बिस्ता, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, सिद्धेश लाड, हार्दिक तामोरे, प्रसाद पवार, अथर्व अंकोलेकर, तनुष कोटियन, शार्दूल ठाकूर, रॉयस्टन डायस, जुनेद खान, हर्ष तन्ना, विनायक भोईर.
पृथ्वीचे गैरवर्तन सुरूच, म्हणून संघाबाहेर!
मुश्ताक अली स्पर्धेतही पृथ्वीचे गैरवर्तन तसेच हलगर्जीपणा कायम राहिला. त्या स्पर्धेत मुंबईचा संघ १० खेळाडूंसह क्षेत्ररक्षण करायचा. पृथ्वीला कोठे तरी लपवावे लागायचे, असा खुलासा मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर केला.
२५ वर्षीय पृथ्वीला मुश्ताक अली स्पर्धेत ९ सामन्यांत एकही अर्धशतक झळकावता आले नाही. त्याने ९ सामन्यांत १९७ धावा केल्या. त्यामुळे रणजी स्पर्धेतून वगळल्यानंतर आता विजय हजारे स्पर्धेतही तो नसेल. आयपीएल लिलावात पृथ्वीवर कोणीही बोली लावली नाही. रणजी स्पर्धेत वाढते वजन व वर्तनाचे कारण देत पृथ्वीला वगळण्यात आले होते. त्यानंतर पृथ्वीने समाजमाध्यमांवर निराशा व्यक्त करताना लवकरच पुनरागमन करू, असे म्हटले होते.
“मुश्ताक अली स्पर्धेत पृथ्वीने २-३ वेळा सराव सत्राला दांडी मारली. स्पर्धा चालू असूनही तो रात्रभर बाहेर राहून सकाळी ६-७ वाजता हॉटेलमध्ये परतायचा. क्षेत्ररक्षण तर सोडाच, पण फलंदाजीतही त्याचे पदलालित्य फारसे दिसत नाही. त्यामुळे खेळाडूच्या नावानुसार नियम बदलू शकत नाहीत. एमसीएचे पदाधिकारी तसेच संघातील वरिष्ठ खेळाडूंनी पृथ्वीशी याविषयी संवाद साधला. तो कोणाचाच शत्रू नाही. मात्र त्याची तंदुरुस्ती व वर्तणूकच त्याची शत्रू आहे,” असे स्पष्ट मत त्या पदाधिकाऱ्याने नोंदवले.
या खेळाडूंवरही चाहत्यांचे लक्ष
विजय हजारे स्पर्धेत निवड समितीसह चाहत्यांचे काही खेळाडूंवर विशेष लक्ष असेल. त्यामध्ये मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, युझवेंद्र चहल या खेळाडूंचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित २ कसोटी सामन्यांसाठी शमीचा भारतीय संघात अद्यापही समावेश केला जाऊ शकतो. शमी या स्पर्धेत बंगालचे प्रतिनिधित्व करणार आहे. मात्र तंदुरुस्तीच्या कारणास्तव तो पहिल्या लढतीत सहभागी होणार नाही. त्याचप्रमाणे फेब्रुवारीत होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताला कुलदीप यादवच्या साथीने मनगटी फिरकीपटूची गरज आहे. त्यामुळे तमिळनाडूचा वरुण चक्रवर्ती, गुजरातचा रवी बिश्नोई, हरयाणाचा युझवेंद्र चहल या खेळाडूंना ही उत्तम संधी आहे. त्याशिवाय अर्शदीप सिंग, आवेश खान, खलिल अहमद, मुकेश कुमार, यश दयाल असे वेगवान गोलंदाज या स्पर्धेत खेळताना दिसतील. हैदराबादच्या तिलक वर्माकडेही चाहत्यांचे खास लक्ष असेल.
स्पर्धेचे स्वरूप कसे?
विजय हजारे स्पर्धेत ३८ संघांचा समावेश असून त्यापैकी पहिल्या ३ गटांत प्रत्येकी ८, तर नंतरच्या दोन गटांत प्रत्येकी ७ संघांचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक गटातील आघाडीचे संघ थेट उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील. तर दुसऱ्या क्रमांकावरील संघांना उपउपांत्यपूर्व फेरीत खेळावे लागेल. तसेच सहा तिसऱ्या क्रमांकावरील संघांनाही संधी मिळेल. स्पर्धेच्या साखळी फेऱ्यांचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार नाही. मात्र बाद फेरीपासून स्पोर्ट्स १८ वाहिनी व जिओ सिनेमा ॲपवर थेट प्रक्षेपण करण्यात येईल.
स्पर्धेची गटवारी
अ-गट : हरयाणा, गुजरात, उत्तराखंड, ओदिशा, झारखंड, गोवा, आसाम, मणिपूर.
ब-गट : महाराष्ट्र, राजस्थान, सेनादल, रेल्वे, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, मेघालय, सिक्कीम.
क-गट : मुंबई, कर्नाटक, हैदराबाद, सौराष्ट्र, पंजाब, पुद्दुचेरी, अरुणाचल प्रदेश, नागालँड.
ड-गट : विदर्भ, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, चंदीगड, जम्मू आणि काश्मीर, मिझोराम.
इ-गट : बंगाल, केरळ, दिल्ली, त्रिपुरा, मध्य प्रदेश, बडोदा, बिहार.