पुनरागमनात श्रेयसची दुहेरी कसोटी! जायबंदी शार्दूलच्या अनुपस्थितीत करणार मुंबईचे नेतृत्व; आज हिमाचल प्रदेशविरुद्ध लढत

भारताचा प्रतिभावान फलंदाज श्रेयस अय्यर मंगळवारी तब्बल अडीच महिन्यांनी क्रिकेटच्या मैदानात परतणार आहे. सध्या सुरू असलेल्या विजय हजारे करंडक या देशांतर्गत एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील उर्वरित साखळी सामन्यांसाठी श्रेयसचा मुंबईच्या संघात समावेश करण्यात आला आहे.
पुनरागमनात श्रेयसची दुहेरी कसोटी! जायबंदी शार्दूलच्या अनुपस्थितीत करणार मुंबईचे नेतृत्व; आज हिमाचल प्रदेशविरुद्ध लढत
X
Published on

जयपूर : भारताचा प्रतिभावान फलंदाज श्रेयस अय्यर मंगळवारी तब्बल अडीच महिन्यांनी क्रिकेटच्या मैदानात परतणार आहे. सध्या सुरू असलेल्या विजय हजारे करंडक या देशांतर्गत एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील उर्वरित साखळी सामन्यांसाठी श्रेयसचा मुंबईच्या संघात समावेश करण्यात आला आहे. तसेच मुंबईचा कर्णधार शार्दूल ठाकूर दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेल्याने पुनरागमन करणाऱ्या श्रेयसकडेच नेतृत्वही सोपवण्यात आले आहे. त्यामुळेच मंगळवारी हिमाचल प्रदेशविरुद्ध श्रेयसची एकप्रकारे दुहेरी कसोटी असेल.

२४ डिसेंबरपासून देशातील विविध शहरांत विजय हजारे स्पर्धेच्या ३३व्या हंगामाला प्रारंभ झाला. १८ जानेवारीपर्यंत रंगणाऱ्या या स्पर्धेत रणजीप्रमाणेच ३८ संघ सहभागी झाले आहेत. त्यापैकी ३२ संघांची चार एलिट गटात, तर उर्वरित ६ संघांची प्लेट गटात विभागणी करण्यात आली आहे. २०२४-२५च्या हंगामात कर्नाटकने अंतिम फेरीत विदर्भाला नमवून पाचव्यांदा ही स्पर्धा जिंकली होती. याबरोबरच त्यांनी सर्वाधिक वेळा विजय हजारे स्पर्धेचे जेतेपद मिळवण्याच्या यादीत तमिळनाडूसह संयुक्तपणे अग्रस्थान मिळवले.

बीसीसीआयने गेल्या वर्षीपासून प्रमुख खेळाडूंनाही रणजी स्पर्धेत अथवा अन्य देशांतर्गत स्पर्धेत खेळणे अनिवार्य केले आहे. एखादा खेळाडू भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत नसल्यास त्याने त्यावेळी सुरू असलेल्या देशांतर्गत स्पर्धेत खेळणे गरजेचे आहे. तसेच दुखापतीमुळे खेळाडू भारतीय संघाबाहेर गेला, तरी त्याला देशांतर्गत स्पर्धेत खेळून पुन्हा लय मिळवण्यासह तंदुरुस्ती सिद्ध करणे अनिवार्य आहे. आता ११ जानेवारीपासून रंगणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी श्रेयसचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र त्यापूर्वी विजय हजारे स्पर्धेत दोन साखळी सामने खेळून त्याला तंदुरुस्ती सिद्ध करण्याचे आदेश बीसीसीआयने दिले आहेत.

३१ वर्षीय श्रेयस ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात झेल घेताना जायबंदी झाला होता. बरगड्यांना झालेल्या दुखापतीतून सावरण्यासाठी श्रेयसला दोन महिन्यांचा कालावधी लागला. त्याला आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला मुकावे लागले. श्रेयस भारताच्या टी-२० व कसोटी संघाचा भाग नाही. तसेच एकदिवसीय संघातील स्थानासाठी सध्या जोरदार चुरस असल्याने श्रेयसला आगामी दोन साखळी सामन्यांसह न्यूझीलंडविरुद्धही छाप पाडावी लागेल.

दरम्यान, मुंबईचा संघ क-गटात १६ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. मुंबईने पाचपैकी चार लढती जिंकल्या आहेत. सलग चार सामने जिंकल्यावर गेल्या लढतीत महाराष्ट्राकडून मुंबईला पराभव पत्करावा लागला. आता मुंबईची उर्वरित दोन साखळी सामन्यांत अनुक्रमे हिमाचल प्रदेश (६ जानेवारी) व पंजाब (८ जानेवारी) यांच्याशी गाठ पडेल. श्रेयस या दोन लढतींनंतर भारतीय संघात दाखल होणार असल्याने मुंबईला बाद फेरीत पुन्हा नव्या कर्णधाराचा शोध घ्यावा लागू शकतो. पंजाब क-गटात अग्रस्थानी आहे.

मुंबईचा या स्पर्धेतील कर्णधार शार्दूल पायाच्या दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला आहे. महाराष्ट्राविरुद्ध वैयक्तिक सातवे षटक टाकत असतानाच तो स्नायू ताणले गेल्यामुळे ड्रेसिंग रूममध्ये परतला. तसेच मुंबईला सर्फराझच्या दुखापतीचीसुद्धा चिंता सतावत आहे. महाराष्ट्राविरुद्ध तो आजारी असल्याने खेळला नाही. त्यालाही कंबरेजवळ दुखापत झाल्याचे समजते. अशा स्थितीत श्रेयसच्या नेतृत्वात मुंबईसमोर उर्वरित दोन लढतींमध्ये खेळाडूंची योग्य निवड करून मोठा विजय मिळवण्याचे आव्हान असेल.

गिल आज परतणार?

भारताच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार शुभमन गिलसुद्धा मंगळवारी विजय हजारे स्पर्धेत खेळण्याची दाट शक्यता आहे. टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघातून गिलला डच्चू देण्यात आला आहे. मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी तोच भारताचा कर्णधार असेल. गिल आफ्रिकेविरुद्ध १४ डिसेंबर रोजी अखेरचा सामना खेळला होता. सध्या तो विजय हजारे स्पर्धेत पंजाबच्या ताफ्यात असला, तरी डिसेंबरमध्ये झालेल्या पायाच्या दुखापतीतून पूर्णपणे न सावरल्यामुळे एकही लढत खेळू शकलेला नाही. त्यामुळे मंगळवारी पंजाब विरुद्ध गोवा या लढतीत गिल खेळणार का, याकडे लक्ष असेल.

मुंबईचा संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), आकाश आनंद, सेल्वेस्टर डीसोझा, तुषार देशपांडे, सर्फराझ खान, तनुष कोटियन, सिद्धेश लाड, शम्स मुलाणी, इशान मुलचंदानी, मुशीर खान, साईराज पाटील, अंक्रिश रघुवंशी, सूर्यांश शेडगे, चिन्मय सुतार, हार्दिक तामोरे, ओमकार तरमळे.

logo
marathi.freepressjournal.in