IND Vs ZIM 2nd T20I : अखेर कर्णधार श्रेयसला सूर गवसला! भारताचा झिम्बाब्वेवर ९० धावांनी दणदणीत विजय

ईशान किशन आणि तिलक वर्मा यांच्या धडाकेबाज अर्धशत-कांच्या जोरावर भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेचा ९० धावांनी धुव्वा उडवला.
अखेर कर्णधार श्रेयसला सूर गवसला! भारताचा झिम्बाब्वेवर ९० धावांनी दणदणीत विजय
अखेर कर्णधार श्रेयसला सूर गवसला! भारताचा झिम्बाब्वेवर ९० धावांनी दणदणीत विजय(Photo-X/@BCCI)
Published on

हरारे : ईशान किशन आणि तिलक वर्मा यांच्या धडाकेबाज अर्धशत-कांच्या जोरावर भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेचा ९० धावांनी धुव्वा उडवला. शनिवारी पार पडलेल्या या विजयामुळे भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा हा दुसरा विजय ठरला आहे.

आयर्लंड (०-२) आणि इंग्लंड (०-४) विरुद्धच्या सलग दोन मालिकांमधील पराभवानंतर नवीन टी-२० कर्णधार श्रेयस अय्यरला या विजयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात अडखळती झाली होती. अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी हे सलामीवीर स्वस्तात बाद झाल्याने भारताची २ बाद २९ अशी स्थिती झाली होती. सूर्यवंशीने ९ चेंडूंत २० धावा केल्या, परंतु रिचर्ड नगारावाच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. यानंतर ईशान किशनने कर्णधार श्रेयस अय्यरसोबत (२५) तिसऱ्या विकेटीसाठी ६६ धावा जोडल्या. त्यानंतर ईशानने तिलक वर्मासोबत चौथ्या विकेटीसाठी ९४ धावांची मोठी भागीदारी केली.

ईशानने ६२ चेंडूंत ८१ धावा फटकावताना ३१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि पुढील ३१ धावा अवघ्या १३ चेंडूंत कुटल्या. दुसऱ्या बाजूने तिलक वर्माने अवघ्या २३ चेंडूंत ५० धावा पूर्ण करत नाबाद ६० धावांची तुफानी खेळी केली. भारतीय फलंदाजांनी शेवटच्या पाच षटकांत ६१ धावा चोपून ५ बाद २१९ धावांचा डोंगर उभारला.

भारताने दिलेल्या २२० धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा डाव अवघ्या ९ षटकांत ५ बाद ५२ असा गडगडला. ब्रायन बेनेटने १९ चेंडूंत ३२ धावा करत आक्रमक सुरुवात केली असली, तरी पदार्पण करणाऱ्या यश ठाकूरने त्याला बाद करत पहिला धक्का दिला. त्यानंतर झिम्बाब्वेचे फलंदाज टिकू शकले नाहीत आणि संपूर्ण संघ १२९ धावांत गुंडाळला गेला. रायन बर्ल आणि ताडी मारुमानी यांनी प्रत्येकी २० पेक्षा जास्त धावा करत थोडा प्रतिकार केला, परंतु तो पुरेसा ठरला नाही.

तिलक वर्माने मोडला धोनी, रैनाचा विक्रम

भारतीय टी-२० संघाचा उपकर्णधार आणि फलंदाज तिलक वर्माने दिग्गज फलंदाज महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैना यांचा विक्रम मागे टाकत आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा सातवा फलंदाज बनण्याचा बहुमान मिळवला आहे. तिलकने नाबाद ६० धावांची तुफानी खेळी साकारली. त्याच्या नावावर टी-२० क्रिकेटमध्ये १,६३४ धावा जमा आहेत. या कामगिरीसह त्याने धोनी (९८ सामन्यांत १,६१७ धावा) आणि सुरेश रैना (७८ सामन्यांत १,६०५ धावा) यांना सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत मागे टाकले आहे. भारतासाठी टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या अव्वल तीन फलंदाजांमध्ये रोहित शर्मा (४,२३१ धावा), विराट कोहली (४,१८८ धावा) आणि सूर्यकुमार यादव (३,२७२ धावा) यांचा समावेश आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in