

नवी दिल्ली : भारताच्या एकदिवसीय संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यरच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. मंगळवारी त्याला अतिदक्षता विभागातून (आयसीयू) बाहेर काढण्यात आले. बीसीसीआयने याविषयी माहिती दिली.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे शनिवारी झालेल्या तिसऱ्या लढतीत क्षेत्ररक्षण करताना श्रेयसला दुखापत झाली होती. ३४व्या षटकात कॅरीचा पाठच्या बाजूने धावत उलटा झेल घेताना श्रेयसला दुखापत झाली. त्याने झेल उत्तम घेतला, मात्र यावेळी जमिनीवर जोरात आपटल्याने श्रेयसला मैदान सोडावे लागले. त्याच्या डाव्या बाजूच्या बरगड्यांना दुखापत झाली. अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने श्रेयसला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच ड्रेसिंग रूममध्येही त्याला चक्कर येत होती, असे समजते. श्रेयसच्या कुटुंबीयांनासुद्धा सिडनी येथे बोलावून घेण्यात आले आहे. मात्र तूर्तास श्रेयसची प्रकृती सुधारली असून बीसीसीआयचा वैद्यकीय चमू व सिडनी येथील विशेषज्ञ वैद्य त्याच्यासोबत आहेत.
आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत खेळण्याची शक्यता कमीच
दरम्यान, बरगड्यांना झालेल्या दुखापतीमुळे श्रेयस किमान ४ आठवडे क्रिकेटपासून दूर राहणार आहे. अशा स्थितीत ३० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपर्यंत तो तंदुरुस्त होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे थेट जानेवारी महिन्यातच न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेत श्रेयस भारतीय संघात परतू शकेल. श्रेयस सध्या फक्त भारताच्या एकदिवसीय संघाचा भाग आहे. तसेच पाठदुखीमुळे त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटपासून (४-५ दिवसीय सामने) सहा महिने दूर राहण्याचे ठरवले आहे.