
मुंबई : ऑस्ट्रेलिया-अ संघाविरुद्ध होणाऱ्या २ चार दिवसीय कसोटी सामन्यांसाठी मुंबईकर श्रेयस अय्यरकडे भारत-अ संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघांमध्ये १६ सप्टेंबरपासून लखनऊच्या इकाना स्टेडियमवर या दोन लढती खेळवण्यात येतील. १६ ते १९ व २३ ते २६ सप्टेंबर या कालावधीत सकाळी ९.३० वाजता दोन्ही सामने सुरू होतील. आशिया चषकासाठी भारतीय संघाचा भाग नसलेले खेळाडू या मालिकेत खेळतील. २ ऑक्टोबरपासून भारत-वेस्ट इंडिड यांच्यात कसोटी मालिका सुरू होणार आहे. त्यादृष्टीने संघनिवडीसाठी या मालिकेतील कामगिरीचा आढावा घेतला जाईल.
आशिया चषकासाठी भारतीय संघातून वगळण्यात आल्यामुळे श्रेयस सध्या चर्चेत आहे. २०२५च्या आयपीएलमध्ये ३० वर्षीय श्रेयसने पंजाब किंग्जचे नेतृत्व करताना संघाला अंतिम फेरीपर्यंत नेले. श्रेयसने १७ सामन्यांत १७५च्या स्ट्राइक रेटने ६०४ धावा केल्या. त्यापूर्वी मार्च महिन्यात झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत श्रेयसने भारताकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या. सध्या तो फक्त एकदिवसीय संघात आहे.
दरम्यान, या मालिकेसाठी के. एल. राहुल व मोहम्मद सिराज फक्त दुसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध असतील. साई सुदर्शन, ध्रुव जुरेल, तनुष कोटियन, यश ठाकूर असे युवा खेळाडू भारत-अ संघाचा भाग आहेत. ऑस्ट्रेलिया-अ संघात सॅम कोन्स्टास, मॅकस्विनी यांचा समावेश आहे.
संघात स्थान न मिळणे निराशाजनक : श्रेयस
मुंबई: जेव्हा तुम्हाला ठाऊक असते की तुम्ही अंतिम ११ जणांच्या संघात असायला हवे. मात्र तरीही तुम्हाला संधी मिळत नाही. तेव्हा कोणत्याही खेळाडूसाठी ते पचवणे फार कठीण असते. किंबहुना यामध्ये तो फार निराश होतो, असे मत भारताचा प्रतिभावान फलंदाज श्रेयस अय्यरने व्यक्त केले.
“संघातील प्रत्येक खेळाडू सर्वोत्तम कामगिरीमुळेच संघात असतो. तुम्ही संघाबाहेर असलात तरी संघाला पाठिंबा देणे, हे कर्तव्य आहे. जेव्हा संघ जिंकत असतो, तेव्हा तुम्ही संघाबाहेर असलात तरी त्याने फरक पडला नाही पाहिजे. मात्र काही वेळेस तुम्हाला प्रोत्साहन मिळणे गरजेचे असते. जेव्हा तुम्हाला सातत्याने मेहनत घेऊनही मुख्य संघात स्थान नाही मिळत, अशा वेळी निराशा येणे स्वाभाविक आहे,” असे श्रेयस एका पॉडकास्टमध्ये म्हणाला.
भारत-अ संघ
श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन, नारायण जगदीशन, साई सुदर्शन, ध्रुव जुरेल, देवदत्त पडिक्कल, हर्ष दुबे, आयुष बदोनी, नितीश कुमार रेड्डी, तनुष कोटियन, प्रसिध कृष्णा, गुर्नूर ब्रार, खलिल अहमद, मानव सुतार, यश ठाकूर.