इंग्लंड, आयर्लंड दौऱ्यासाठी आज भारताची संघनिवड

भारताचा मधल्या फळीतील अनुभवी फलंदाज श्रेयस अय्यर हा सूर्यकुमार यादवच्या जागी भारतीय टी-२० संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त होण्याची दाट शक्यता आहे.
इंग्लंड, आयर्लंड दौऱ्यासाठी आज भारताची संघनिवड
इंग्लंड, आयर्लंड दौऱ्यासाठी आज भारताची संघनिवड
Published on

मुंबई : भारताचा मधल्या फळीतील अनुभवी फलंदाज श्रेयस अय्यर हा सूर्यकुमार यादवच्या जागी भारतीय टी-२० संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त होण्याची दाट शक्यता आहे. इंग्लंड आणि आयर्लंड या युनायटेड किंगडम (यूके) दौऱ्यासाठी तसेच जपानमधील आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पांढऱ्या चेंडूच्या मालिकेचा संघ निश्चित करण्यासाठी शनिवारी मुंबईत राष्ट्रीय निवड समितीची बैठक होणार आहे. यावेळीच सूर्यकुमारच्या भवितव्याविषयी निर्णय घेतला जाईल.

अफगाणिस्तानविरुद्ध मायदेशात कसोटी सामना व एकदिवसीय मालिका खेळल्यानंतर भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर जाईल. या दौऱ्यात २६ आणि २८ जून रोजी बेलफास्ट येथे आयर्लंडविरुद्ध दोन टी-२० सामने होतील. मग १ जुलैपासून इंग्लंडविरुद्ध पाच टी-२० आणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. जपानमधील आयची-नागोया येथे सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान आशियाई स्पर्धा होणार असून आयोजकांनी दिलेल्या मुदतीमुळे या स्पर्धेचा संघ आधीच जाहीर केला जात आहे.

दरम्यान, टी-२० संघात मुंबई इंडियन्सचा युवा फलंदाज तिलक वर्माची उपकर्णधार म्हणून निवड होण्याची शक्यता असून १५ वर्षांचा फलंदाज वैभव सूर्यवंशी याला पहिल्यांदाच वरिष्ठ संघात पाचारण केले जाऊ शकते. दुसरीकडे, या वर्षाच्या सुरुवातीला भारताला टी-२० विश्वचषक जिंकून देणाऱ्या सूर्यकुमारला केवळ कर्णधारपदावरूनच हटवले जात नाही, तर खराब फॉर्मामुळे त्याला संघातूनही वगळले जाण्याची शक्यता आहे. सूर्यकुमार गेल्या १८ महिन्यांपासून मनगटाच्या दुखापतीसह खेळत असल्याचा संशय आहे. विश्वचषक संघात नसलेला ३१ वर्षीय श्रेयस आता फलंदाजीत चौथ्या क्रमांकावर खेळण्याची शक्यता आहे.

दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्ज या तीन वेगवेगळ्या फ्रँचायझींना आयपीएलच्या अंतिम फेरीत नेणारा आणि एकदा विजेतेपद मिळवून देणारा तो एकमेव कर्णधार असल्याने त्याच्या नेतृत्वावर निवड समितीने विश्वास दाखवला आहे. कर्णधारपद सांभाळताना त्याच्या फलंदाजीतील फॉर्ममध्ये घसरण झालेली नाही. यंदाच्या आयपीएलच्या उत्तरार्धात पंजाबच्या कामगिरीत झालेली घसरण, हाच काय तो त्याच्या नेतृत्वातील एकमेव खराब टप्पा होता.

logo
marathi.freepressjournal.in