मुंबई : भारताचा अनुभवी फलंदाज श्रेयस अय्यरने पाठदुखीमुळे लाल चेंडूने होणाऱ्या सामन्यांतून तब्बल सहा महिने विश्रांती घेतली असल्याचे बीसीसीआयने गुरुवारी स्पष्ट केले. त्यामुळे श्रेयस आगामी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतही खेळणार नाही. अशा स्थितीत श्रेयसचे कसोटी संघातील पुनरागमनाच्या आशा पूर्णपणे मावळल्या आहेत, असे म्हणू शकतो.
अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय निवड समितीने गुरुवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. तसेच ऑस्ट्रेलिया-अ संघाविरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारत-अ संघही यावेळी जाहीर करण्यात आला. एकीकडे श्रेयस हा एकदिवसीय मालिकेत भारत-अ संघाचे नेतृत्व करणार आहे. मात्र प्रथम श्रेणी क्रिकेटपासून त्याने सहा महिने दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. रणजी स्पर्धा १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून फेब्रुवारीत अंतिम सामना रंगणार आहे. त्यामुळे श्रेयस संपूर्ण हंगामाला मुकणार असून तो आता प्रामुख्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटवरच लक्ष केंद्रित करणार आहे.
३० वर्षीय श्रेयस हा ऑस्ट्रेलिया-अ संघाविरुद्ध सुरू असलेल्या चार दिवसीय कसोटी मालिकेत भारत-अ संघाचा कर्णधार होता. मात्र पहिल्या लढतीत भारत-अ संघाचे नेतृत्व केल्यानंतर श्रेयसने मंगळवारपासून सुरू झालेल्या दुसऱ्या सामन्यातून माघार घेतली. पाठदुखीने यापूर्वीही श्रेयसला सतावले असून तो आता कधी परतणार, हे पाहणे रंजक ठरेल.
दरम्यान, भारत-ऑस्ट्रेलियाच्या ‘अ’ संघांमध्ये कानपूर येथे ३० सप्टेंबरपासून ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू होईल. या मालिकेसाठी निवडण्यात आलेले काही खेळाडू हे सध्या आशिया चषकात भारतीय संघाचा भाग आहेत. त्यामुळे ते दुसऱ्या सामन्यापासून भारत-अ संघात दाखल होतील.
एकदिवसीय मालिकेसाठी भारत-अ संघ
पहिल्या सामन्यासाठी : श्रेयस अय्यर (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, रियान पराग, आयुष बदोनी, सूर्यांश शेडगे, विपराज निगम, निशांत सिंधू, गुर्जापनीत सिंग, युधवीर सिंग, रवी बिश्नोई, अभिषेक पोरेल, प्रियांश आर्या, सिमरजीत सिंग.
दुसऱ्या व तिसऱ्या सामन्यासाठी : श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंग, रियान पराग, आयुष बदोनी, विपराज निगम, निशांत सिंधू, गुर्जापनीत सिंग, युधवीर सिंग, रवी बिश्नोई, अभिषेक पोरेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग.