

मुंबई : भारताला टी-२० वर्ल्डकपचे जेतेपद मिळवून दिल्यानंतर आयपीएलमध्ये खराब कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमार यादवला भारतीय टी-२० संघातून डच्चू देण्यात आला आहे. भारतीय टी-२० क्रिकेट संघात मोठे फेरबदल करण्यात आले असून श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशी या उदयोन्मुख खेळाडूला भारतीय संघात स्थान दिले आहे. वयाच्या अवघ्या १५ वर्षे आणि ७१ दिवस वय असलेला वैभव सूर्यवंशी हा भारतीय संघात निवड झालेला इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. या निवडीसह त्याने महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा प्रदीर्घ काळापासून असलेला विक्रम मोडीत काढला आहे. सचिन तेंडुलकरने १५ नोव्हेंबर १९८९ रोजी कराची येथे पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण केले, तेव्हा त्याचे वय १६ वर्षे आणि २०५ दिवस इतके होते.
भारतीय संघ आगामी दौऱ्यात आयर्लंडमध्ये २६ आणि २८ जून रोजी दोन टी-२० सामने खेळणार आहे. यानंतर १ ते ११ जुलैदरम्यान इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. श्रेयस अय्यर ३ डिसेंबर २०२३ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध बेंगळुरू येथे खेळल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रीय टी-२० संघात परतला आहे. सूर्यकुमार यादवने फक्त नेतृत्वच नव्हे तर संघातील आपले स्थानही गमावले आहे. त्यामुळे एका मुंबईकराकडून काढून घेण्यात आलेले नेतृत्व मुंबईच्याच निवड समिती अध्यक्षाने एका मुंबईकराकडेच सोपवले आहे.
विविध दौऱ्यांसाठी संघाची घोषणा केल्यानंतर मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "श्रेयसने गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या फ्रँचायझींचे नेतृत्व करताना उत्तम कामगिरी केली आहे. त्याने एकदा अंतिम सामना जिंकला आणि यंदाच्या मोसमात चांगल्या सुरुवातीनंतर एका कठीण परिस्थितीचा सामना केला. एका कर्णधाराला ज्या परिस्थिती हाताळाव्या लागतात, त्या सर्व त्याने पाहिल्या आहेत. त्याची स्वतःची कामगिरी देखील उत्कृष्ट राहिली आहे. श्रेयस अय्यर टी-२० विश्वचषक संघात निवडीच्या खूप जवळ होता, मात्र सूर्यकुमार यादव संघात असल्याने त्यावेळी श्रेयसला स्थान मिळू शकले नव्हते." टी-२० फॉरमॅटमध्ये नेतृत्व करण्याचा पुरेसा अनुभव असलेला श्रेयस हा कर्णधारपदासाठी सध्या सर्वात योग्य उमेदवार आहे आणि हे त्याच्यासाठी एक नवीन आव्हान असेल, असेही आगरकर यांनी सांगितले.
इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ :
श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्णोई, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव आणि वैभव सूर्यवंशी.
आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघ :
श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्णोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमरा आणि वैभव सूर्यवंशी.
श्रीलंकेविरुद्धच्या बहुदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघ :
ध्रुव जुरेल (कर्णधार), साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, आयुष पांडे, ऋतुराज गायकवाड, हर्ष दुबे, सारांश जैन, गुरनूर ब्रार, आकिब नबी, यश ठाकूर, एन, जगदीशन, अमन मोखाडे, शैक रशीद, झीशान अन्सारी.
कर्णधार म्हणून श्रेयस ठरला प्रभावी
टी-२० संघात जवळपास अडीच वर्षांनी श्रेयस अय्यरचे भारतीय संघात पुनरागमन झाले असले तरी आयपीएलध्ये श्रेयसची कामगिरी दमदार राहिली आहे. त्याने कोलकाता नाइट रायडर्सला २०२४मध्ये जेतेपद मिळवून दिले होते. तसेच त्यानंतरही सलग दोन वर्षे सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या श्रेयसने आपल्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्सला २०२५मध्ये अंतिम फेरीपर्यंत मजल मारून दिली होती.
सूर्यवंशी ठरणार गेमचेंजर
बिहारच्या १५ वर्षीय युवा खेळाडूचा भारतीय संघात समावेश करण्यात आल्यामुळे वैभव सूर्यवंशी हा नवा गेमचेंजर ठरणार आहे. राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशीने यंदाच्या आयपीएलमध्ये तुफान कामगिरी करत एक शतक आणि पाच अर्धशतकांसह ७७६ धावा करत ऑरेंज कॅपसह विविध पुरस्कारांना गवसणी घातली होती. वैभव सूर्यवंशीच्या सामन्याला कलाटणी देण्याच्या याच क्षमतेमुळे निवड समिती अध्यक्ष आगरकर प्रभावित झाले आहेत.
तिलक वर्मा नवा उपकर्णधार
मधल्या फळीतील फलंदाज तिलक वर्मा हा भारतीय टी-२० संघाचा नवा उपकर्णधार असेल. त्याचबरोबर इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी लखनौ सुपर जायंट्सतर्फे दमदार कामगिरी करणाऱ्या प्रिन्स यादवचाही संघात समावेश करण्यात आला आहे. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा हा इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्याला मुकरणार असून आशियाई स्पर्धेसाठी तो संघात पुनरागमन करेल.