

अहमदाबाद : कर्णधार श्रेयस अय्यर हा ९७ धावांवर खेळत असतानाही त्याने मला शेवटच्या षटकात त्याच्या शतकाची चिंता न करण्याचा आणि संघासाठी जास्तीत जास्त धावा जमवण्यासाठी फटकेबाजी करण्याचा सल्ला दिला होता, असा खुलासा पंजाब किंग्जचा फलंदाज शशांक सिंह याने केला. आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील मंगळवारी खेळल्या गेलेल्या गुजरात टायटन्सविरुद्धच्या लढतीत अय्यरचे शतक अवघ्या ३ धावांनी हुकले होते.
या सामन्यात मोहम्मद सिराज अखेरचे षटक टाकण्यास आला तेव्हा श्रेयस ४२ चेंडूंत ९७ धावांवर नाबाद होता. पण तो नॉन-स्ट्राईकला होता आणि शशांक सिंह स्ट्राईकवर होता. शशांकने मोहम्मद सिराजला ५ चौकार लगावले आणि षटकात २३ धावा चोपल्या. पण त्यामुळे अय्यरला एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही आणि पहिलेवहिले शतक अवघ्या ३ धावांनी हुकले. श्रेयसने आपल्या खेळीत ९ षटकार आणि ५ चौकार लगावले. या बळावर पंजाबने ५ फलंदाज गमावून २४३ धावांचा डोंगर उभारला. पंजाबने हंगामातील ही सलामीची लढत अवघ्या ११ धावांनी जिंकली.
याबाबत सामना संपल्यानंतर बोलताना, "प्रामाणिकपणे सांगायचे तर मी धावफलक बघितला नव्हता. पण पहिल्याच चेंडूवर मी चौकार लगावला. त्यानंतर मी धावफलकाकडे पाहिले तेव्हा अय्यर ९७ धावांवर असल्याचे बघितले. मी त्याला विचारणारच होतो की एक धाव काढून तुला स्ट्राईक देऊ का? पण तितक्यात श्रेयसच माझ्याजवळ आला आणि माझ्या सतकाची चिंता करु नकोस. फटकेबाजी कर आणि संघासाठी जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न कर", असे शशांकने सांगितले. हे सांगण्यासाठी खूप मोठं मन आणि धाडस लागतं कारण टी-२० मध्ये, विशेषतः आयपीएलमध्ये, शतकं बनवणं सोपं नाहीये. त्यामुळे मला आणखी आत्मविश्वास मिळाला, असेही शशांकने पुढे नमूद केले.
सोशल मीडियावर काही नेटकरी शशांकला श्रेयसचे शतक पूर्ण न होऊ दिल्याबद्दल ट्रोल करीत होते. पण आता यसनेच संघासाठी फटकेबाजी करण्याचा सल्ला शशांकला दिला होता, हे स्पष्ट झालं आहे.