मुंबई : मुंबईचा २९ वर्षीय फलंदाज श्रेयस अय्यर पाठदुखीमुळे रणजीतील अंतिम फेरीच्या पाचव्या दिवशीसुद्धा क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नाही. श्रेयसची पाठदुखीची समस्या गंभीर असल्याचे समजते. त्यामुळे आयपीएलमधील सुरुवातीच्या २-३ सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे.
श्रेयस आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघाचे नेतृत्व करणार आहे. गतवर्षी पाठदुखीमुळे तो संपूर्ण आयपीएलला मुकला. नुकताच बीसीसीआयच्या वार्षिक करार यादीतून काढण्यात आल्याने श्रेयस चर्चेत होता. रणजी करंडकाच्या अंतिम फेरीत श्रेयसने दुसऱ्या डावात ९५ धावा केल्या. यादरम्यानच त्याच्या पाठदुखीने पुन्हा डोके वर काढले. चौथ्या दिवशीही त्याने क्षेत्ररक्षण केले नाही. दिवसाच्या अखेरीस तो गुरुवारी क्षेत्ररक्षण करेल, असे सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. त्यामुळे आता श्रेयसच्या तंदुरुस्तीविषयी कोणते अपडेट येणार, हे पाहणे रंजक ठरेल.
बंगळुरूचे सराव शिबीर सुरू; विराटची प्रतीक्षा
२२ मार्चपासून रंगणाऱ्या आयपीएलच्या आगामी हंगामासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे सराव शिबीर गुरुवारपासून सुरू झाले. यावेळी फॅफ डुप्लेसिस, अल्झारी जोसेफ या विदेशी खेळाडूंसह रजत पाटिदार, आकाश दीप हे भारतीय खेळाडू शिबिरात सहभागी झाले. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून वैयक्तिक कारणामुळे क्रिकेटपासून दूर असलेला विराट कोहली २-३ दिवसांच्या अंतरात या शिबिरात सहभागी होईल, असे समजते. नवे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी यासंबंधी माहिती देताना विराट ‘आरसीबी अनबॉक्स’ कार्यक्रमात सहभागी होईल, असे सांगितले. आरसीबी अनबॉक्स कार्यक्रमात चाहत्यांना खेळाडूंशी संवाद साधायला मिळतो. तसेच त्यांच्यासाठी एक प्रदर्शनीय सामनाही खेळवण्यात येतो. आयपीएलमध्ये बंगळुरूची २२ तारखेला सलामीच्या लढतीत गतविजेत्या चेन्नईशी गाठ पडेल.