गिलसाठी शिकण्याची सर्वोत्तम संधी! एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी नेमणूक झाल्याबद्दल सहकारी अक्षरकडून अभिनंदन

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या तारांकित खेळाडूंचा अनुभव युवा कर्णधार शुभमन गिलसाठी लाभदायी ठरेल. त्याला कर्णधार म्हणून शिकण्यासाठी ही सर्वोत्तम संधी आहे, असे मत भारताचा डावखुरा अष्टपैलू अक्षर पटेलने व्यक्त केले.
गिलसाठी शिकण्याची सर्वोत्तम संधी! एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी नेमणूक झाल्याबद्दल सहकारी अक्षरकडून अभिनंदन
BCCI
Published on

पर्थ : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या तारांकित खेळाडूंचा अनुभव युवा कर्णधार शुभमन गिलसाठी लाभदायी ठरेल. त्याला कर्णधार म्हणून शिकण्यासाठी ही सर्वोत्तम संधी आहे, असे मत भारताचा डावखुरा अष्टपैलू अक्षर पटेलने व्यक्त केले.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात १९ ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका रंगणार आहे. त्यानंतर उभय संघांत ५ टी-२० सामनेही खेळवण्यात येणार आहेत. यांपैकी एकदिवसीय मालिकेतील सर्व खेळाडू बुधवारी ऑस्ट्रेलियात दाखल झाले, तर गुरुवारपासून त्यांनी सरावाला प्रारंभ केला. ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धच्या मालिकेसाठी ३८ वर्षीय रोहितकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढून घेत २५ वर्षीय शुभमन गिलकडे सोपवण्यात आल्याने अनेकांना धक्का बसला. अक्षरने मात्र निवड समितीच्या निर्णयाचा आदर राखत गिलला पाठिंबा दिला आहे.

“कर्णधार म्हणून रोहितविषयी मी काय बोलणार. दोन आयसीसी ट्रॉफी जेतेपद त्याची महती स्पष्ट करतात. रोहित व विराट यांच्या अनुभवाचा गिलला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात फार लाभ होईल. ते दोघेही भारताचे एकेकाळी कर्णधार होते. त्यामुळे गिल त्यांच्याकडून बरेच काही शिकू शकतो,” असे अक्षर म्हणाला. रविवारपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेच्या निमित्ताने शुक्रवारी पर्थ येथील मैदानातच पत्रकार परिषद पार पडली.

“गिलने इंग्लंड आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकांमध्ये स्वत:ला सिद्ध केले. त्याने फलंदाज व कर्णधार म्हणूनही छाप पाडली. आता एकदिवसीय प्रकारात तो कामगिरीत सातत्य राखेल, असे अपेक्षित आहे. गिलकडे नक्कीच उत्तम नेतृत्वगुण आहेत. आयपीएलमध्येही तो एका संघाचा कर्णधार आहे. त्यामुळे त्याच्या नेतृत्वात भारत आणखी प्रगती करेल,” असेही अक्षरने सांगितले.

दरम्यान, रोहित व विराट कोहली या मालिकेद्वारे जवळपास सात महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणार आहेत. परंतु रोहित मात्र यावेळी फक्त खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आला आहे. रोहित व विराट मार्च २०२५मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताकडून अखेरचा सामना खेळले आहेत. त्यानंतर मे महिन्यात दोघांनीही कसोटीतून निवृत्ती जाहीर केली, तर दोघेही गतवर्षी टी-२० प्रकारांतूनही निवृत्त झाले आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर या दोघांच्या कामगिरीकडेच सर्वाधिक लक्ष असेल. २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत दोन्ही खेळाडू आपले स्थान टिकवणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

भारतीय संघाने सप्टेंबरमध्ये दुबईत आशिया चषक टी-२० स्पर्धा विक्रमी नवव्यांदा जिंकण्याचा पराक्रम केला. त्यानंतर नुकताच गिलच्या नेतृत्वात भारताने विंडीजला कसोटी मालिकेत २-० अशी धूळ चारली. भारताने विंडीजला पहिल्या कसोटीत एक डाव आणि १४० धावांच्या फरकाने पराभूत केले, तर दुसऱ्या कसोटीत ७ गडी राखून विजय मिळवला. या मालिकेतील गिल, के. एल. राहुल, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल, नितीश रेड्डी व वॉशिंग्टन सुंदर हे खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेचादेखील भाग आहेत. त्यामुळे त्यांच्या तंदुरुस्तीचाही कस लागेल. आता उत्सुकता भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेची आहे.

रोहित-विराट नक्कीच विश्वचषक खेळतील : हेड

ऑस्ट्रेलियाचा डावखुरा सलामीवीर ट्रेव्हिस हेडने रोहित व विराट हे दोघेही २०२७चा एकदिवसीय विश्वचषक खेळतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. “रोहित-विराट हे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील महान खेळाडू आहेत. दोघांनीही भारतासाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यातही विराट हा संपूर्ण विश्वात श्रेष्ठ आहे. त्याची तंदुरुस्ती व एकदिवसीय प्रकारातील कामगिरी पाहता २०२७चा विश्वचषक खेळणे फारसे कठीण नसेल. रोहितही त्याच मार्गावर असून आता कर्णधारपदाचे दडपण नसल्याने तो आणखी मुक्तपणे खेळू शकतो,” असेही हेडने सांगितले. दरम्यान, कॅमेरून ग्रीन दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या मालिकेस मुकणार असून त्याच्या जागी मार्नस लबुशेनचे संघात पुनरागमन झाले आहे.

logo
marathi.freepressjournal.in